Mukesh Ambani Companies Shares : अंबानी आणि रिलायन्स ही उद्योग विश्वातील समांतर नावं आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रिलायन्सचं नाव घेतलं की मुकेश अंबानी यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. रिलायन्स ही सध्या देशातील सर्वाधिक भांडवली मूल्य असलेली कंपनी आहे. तिच्या शेअरची किंमतही ३,००० च्या आसपास आहे. मात्र, मुकेश अंबानी यांच्या छत्रछायेखाली अशाही काही कंपन्या आहेत, ज्यांच्या शेअरची किंमत ६० रुपयांपेक्षा कमी आहे.
शेअरची किंमत स्वस्त असलेल्या या कंपन्यांमध्ये आलोक इंडस्ट्रीज, हॅथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड आणि डेन नेटवर्क्स लिमिटेड या तीन कंपन्या आहेत. आलोक इंडस्ट्रीज ही टेक्सटाइल कंपनी आहे, तर डेन नेटवर्क्स आणि हॅथवे केबल या टीव्ही ब्रॉडकास्टिंग आणि सॉफ्टवेअर उत्पादन व्यवसायात आहेत. मंगळवारी या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्सना मोठी मागणी होती.
आलोक इंडस्ट्रीजचा शेअर मंगळवारी २७.२४ रुपयांवर बंद झाला. हा शेअर आदल्या दिवसाच्या तुलनेत २.५६ टक्क्यांनी वधारून बंद झाला. जानेवारी २०२४ मध्ये हा शेअर ३९.२४ रुपयांवर पोहोचला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. कंपनीत प्रवर्तकांचा ७५ टक्के आणि सार्वजनिक भागधारकांचा २५ टक्के हिस्सा आहे. प्रवर्तकांमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडं ४०.०१ टक्के म्हणजेच १,९८,६५,३३,३३३ शेअर्स आहेत. तर जेएम फायनान्शियल अॅसेट्सकडं कंपनीचे १,७३,७३,११,८४४ शेअर्स आहेत. हा हिस्सा ३४.९९ टक्के एवढा आहे.
डेन नेटवर्क्स लिमिटेडचा शेअर मंगळवारी ४.२२ टक्क्यांनी वधारून ५४.८८ रुपयांवर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वाढून ५५.४९ रुपयांवर पोहोचला. जानेवारी २०२४ मध्ये हा शेअर ६९.४० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास एकूण प्रवर्तक हिस्सा ७४.९० टक्के आहे. या कंपनीत रिलायन्स इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड, रिलायन्स व्हेंचर्स लिमिटेड आणि नेटवर्क १८ मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांचा वाटा आहे. त्याचप्रमाणे जिओ टेलिव्हिजन डिस्ट्रिब्यूशन होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, जिओ फ्यूचरिस्टिक डिजिटल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जिओ डिजिटल डिस्ट्रिब्यूशन होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड यांचाही कंपनीत हिस्सा आहे.
बीएसईवर या कंपनीच्या शेअरची किंमत २०.८९ रुपये आहे. मंगळवारी हा शेअर २ टक्क्यांहून अधिक वधारला. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २७.९० रुपये आहे. कंपनीच्या शेअरहोल्डिंगमध्ये प्रवर्तकांचा वाटा ७५ टक्के आणि सार्वजनिक भागधारकांचा वाटा २५ टक्के आहे. प्रवर्तकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज - जिओ कंटेंट डिस्ट्रीब्यूशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, जिओ इंटरनेट डिस्ट्रिब्यूशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि जिओ केबल अँड ब्रॉडबँड होल्डिंग यांचा समावेश आहे.