Muhurat trading in share market : दिवाळीच्या निमित्तानं आज शेअर बाजार बंद असला तरी प्रथेप्रमाणे मुहूर्ताचं ट्रेडिंग होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे ट्रेडिंग एक तासाचं असेल. आज सायंकाळी सहा वाजल्यापासून मुहूर्ताचं ट्रेडिंग होईल. या काळात गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी-विक्री करता येणार आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूकदार वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात. या दिवशी शेअर बाजारातील व्यवहार अत्यंत शुभ मानले जातात. भारतातील शेअर ब्रोकर्स दिवाळीकडं आपल्या आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणून पाहतात. अनेक गुंतवणूकदार या काळात शेअरखरेदीकडं आगामी वर्षासाठी समृद्धीला आमंत्रण देण्याचा मार्ग म्हणून पाहतात. पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्याची ही वेळ असते.
भारतीय शेअर बाजारात उपलब्ध माहितीनुसार, आज, १ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत एक तासाचं विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र होईल. मात्र, ट्रेड मॉडिफिकेशनची वेळ सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी संपणार आहे. संध्याकाळी ७.१० वाजेपर्यंत ट्रेडमध्ये बदल करता येतील.
सत्र संपण्याच्या १५ मिनिटे आधी सर्व इंट्राडे पोझिशन्स आपोआप बंद होतील. त्यामुळं व्यवहारांचे काळजीपूर्वक नियोजन करणं आवश्यक आहे हे गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावं, असं बीएसईच्या नोटिशीत म्हटलं आहे.
आजवरचा इतिहास पाहिल्यास बीएसई सेन्सेक्स मागील १७ मुहूर्त ट्रेडिंग सत्रांपैकी १३ सत्रांमध्ये तेजीसह बंद झाला. २००८ मध्ये बीएसई सेन्सेक्स सर्वाधिक ५.८६ टक्क्यांनी वधारून ९००८ वर पोहोचला होता. या सत्रांमध्ये इक्विटी निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली असली तरी ट्रेडिंग व्हॉल्यूम कमी आहे आणि एवढ्या कमी कालावधीत मोजक्याच शेअर्समध्ये लक्षणीय हालचाल दिसून येते.