Swiggy IPO listing today : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी लिमिटेडचे शेअर्स बुधवारी बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध झाले. मात्र, ज्या अपेक्षेनं लोकांनी गुंतवणूक केली होती, ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. गुंतवणूकदारांची मुद्दल मात्र शाबित राहिली.
स्विगीचा शेअर बीएसईवर ३९० रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडच्या तुलनेत ५.६४ टक्के प्रीमियमसह ४१२ रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजेच अवघे २२ रुपये वाढले. ग्रे मार्केटमध्ये याची किंमत १ टक्के प्रीमियमपर्यंत गेली होती. त्यामुळं हा शेअर पडून लिस्ट होतो की काय अशी चर्चा होती. मात्र, तसं झालं नाही.
स्विगीचा आयपीओ तीन दिवसांत ३.५९ पट सब्सक्राइब झाला. एनएसईकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या शेअर विक्रीत १६,०१,०९,७०३ समभागांच्या ऑफरच्या तुलनेत ५७,५३,०७,५३६ शेअर्ससाठी बोली लागली होती. हा आयपीओ पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) श्रेणीत ६.०२ पट, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार श्रेणीत (आरआयआय) कोटा १.१४ पट सब्सक्राइब झाला. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या शेअरला ४१ टक्के सबस्क्रिप्शन मिळालं. स्विगीनं अँकर (मोठ्या) गुंतवणूकदारांकडून ५,०८५ कोटी रुपये गोळा केले होते.
स्विगीचा आयपीओ ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. बेंगळुरूस्थित या कंपनीच्या आयपीओची किंमत ३७१ ते ३९० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. कंपनीने आयपीओमधून ११,३२७ कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. यात ४,४९९ कोटी रुपयांचे शेअर्स नव्यानं इश्यू करण्यात आले आणि ६,८२८ कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेल (ओएफएस) चा समावेश होता.