Share Market News : कर्जात बुडालेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) चे शेअर्स आज तब्बल २० टक्क्यांपर्यंत उसळले आहेत. मंगळवार ४७.६४ रुपयांवर बंद झालेला हा शेअर आज थेट ५७.१६ रुपयांवर पोहोचला. केंद्र सरकारच्या एका संभाव्य निर्णयाच्या बातमीमुळं शेअरमध्ये ही तेजी आली आहे.
'सीएनबीसी आवाज'नं दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारनं कंपनीच्या १६,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मुद्रीकरणाला (Asset Monetisation) मंजुरी दिली आहे. त्यामुळं कर्जाची परतफेड आणि ऑपरेशनल पुनर्रचनेचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी नवीन योजनेची घोषणा केली. त्याचाही परिणाम शेअरवर झाला आहे. अवघ्या दोन दिवसात हा शेअर २७.५८ टक्क्यांनी वधारला आहे.
अर्थसंकल्प २०२५ च्या संदर्भात दिलेल्या मुलाखतीत निर्गुंतवणुकीचे आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (दीपम) सचिव अरुणीश चावला यांनी एमटीएनएल आणि बीएसएनएल या दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेच्या मुद्रीकरणावर भाष्य केलं. 'एमटीएनएल आणि बीएसएनएलकडं असलेल्या मालमत्तेचं मुद्रीकरण करण्यात आम्ही मदत करणार आहोत, जेणेकरून लॉक झालेल्या मूल्याचा पुनर्वापर करता येईल. या माध्यमातून या कंपनीचं पुनरुज्जीवन करू शकू,' असं ते म्हणाले.
सरकारी मालकीच्या आणि कर्जबाजारी असलेल्या एमटीएनएलला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बहुतांश सरकारी बँकांनी अनुत्पादक मालमत्ता म्हणून घोषित केलं होतं. या अहवालानुसार बँकांकडं एमटीएनएलची ७,९२५ कोटी रुपयांची थकबाकी असून एकूण ३२,००० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात अल्प आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही समावेश आहे.
एमटीएनएलचा शेअर २० टक्क्यांनी वधारून ५७.२१ रुपयांवर आहे. हा शेअर १०१.५ रुपयांच्या आधीच्या उच्चांकी पातळीवरून निम्म्यावर आला आहे. या वर्षी आतापर्यंत या शेअरनं १० टक्के, वर्षभरात १५ टक्के आणि पाच वर्षांत ४०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
संबंधित बातम्या