MRF Share Price : चक्रावून टाकणारी तेजी! एका दिवसात तब्बल ७ हजार रुपयांनी वाढला शेअर, सध्याचा भाव किती?-mrf share soared more than 7000 rupee in a day company reported 571 crore rupee profit ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  MRF Share Price : चक्रावून टाकणारी तेजी! एका दिवसात तब्बल ७ हजार रुपयांनी वाढला शेअर, सध्याचा भाव किती?

MRF Share Price : चक्रावून टाकणारी तेजी! एका दिवसात तब्बल ७ हजार रुपयांनी वाढला शेअर, सध्याचा भाव किती?

Aug 08, 2024 07:23 PM IST

MRF Share price : देशातील सर्वात महागडा शेअर असलेल्या एमआरएफ कंपनीचा शेअर आज तब्बल ७ हजार रुपयांनी वाढला आहे.

चक्रावून टाकणारी तेजी! एका दिवसात तब्बल ७ हजार रुपयांनी वाढला शेअर, सध्याचा भाव किती?
चक्रावून टाकणारी तेजी! एका दिवसात तब्बल ७ हजार रुपयांनी वाढला शेअर, सध्याचा भाव किती?

MRF Share price : शेअर मार्केटमध्ये शेअरच्या भावातील घसरण जशी धक्का देऊन जाते, तशी कधी-कधी वाढही चक्रावून टाकते. प्रसिद्ध टायर कंपनी एमआरएफ लिमिटेडच्या (MRF) शेअरच्या बाबतीत असंच घडलं आहे. एमआरएफच्या शेअरमध्ये गुरुवारी तब्बल ७००० रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. गुंतवणूकदारांसाठी हा सुखद धक्का ठरला.

एमआरएफ कंपनीचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वाढून १४२४८५.१० रुपयांवर पोहोचला. बुधवारी कंपनीचा शेअर १३४६६१.९५ रुपयांवर बंद झाला होता. तो आज तब्बल ७८२३.१५ रुपयांनी वधारला. दिवसअखेर बीएसईवर कंपनीचा शेअर १४००५६.०० रुपयांवर बंद झाला. 

नफ्यात घट, उत्पन्नात वाढ

एमआरएफनं आज चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या पहिल्या तिमाहीत एमआरएफ लिमिटेडला ५७१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या वर्षी जून तिमाहीत कंपनीला ५८९ कोटी रुपयांचा नफा झाला होता. मात्र एकूण उत्पन्नात वाढ झाली आहे. 

एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत कंपनीचा महसूल १२ टक्क्यांनी वाढून ७१९६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत उत्पन्नाचा हा आकडा ६४४० कोटी रुपये होता. जून २०२४ च्या तिमाहीत एमआरएफचा ऑपरेटिंग नफा ६७९ कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तो ४ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा ७१२ कोटी रुपये होता.

कशी आहे शेअरची वाटचाल?

गेल्या वर्षभरात एमआरएफच्या शेअरमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ८ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचा शेअर १०७६६७.७५ रुपयांवर होता. तोच आज १४००५६ रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात एमआरएफ लिमिटेडच्या शेअरमध्ये ३२३८८.२५ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात एमआरएफच्या शेअरमध्ये जवळपास ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १५१२८३.४० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १०४७५०.९५ रुपये आहे. एमआरएफ हा देशातील सर्वात महागडा शेअर आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

विभाग