Share Market News Today : एमआरएफचा किमान एक शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावा असं प्रत्येक छोट्या गुंतवणूकदाराला वाटत असतं. त्याचं कारणही तसंच आहे. कारण, या शेअरनं गुंतवणूकदारांना केवळ लखपतीच नाही तर कोट्यधीश केलं आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या शेअर उतरती कळा लागली आहे.
MRF चा शेअर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घसरत आहे. या शेअरनं मंगळवारी ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला. मंगळवारी हा शेअर एनएसईवर १,१२०९९ रुपयांपर्यंत घसरला. मागच्या एका वर्षातील ही नीचांकी पातळी आहे. तर शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १,५१,४४५ रुपये आहे. मागच्या एका वर्षात शेअरनं २० टक्क्यांहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे. अवघ्या एका महिन्यात हा स्टॉक सुमारे १४ टक्क्यांनी घसरला आहे. एका वर्षात तो २९ हजार रुपयांनी तर एका महिन्यात १८ हजार रुपयांनी पडला आहे.
एमआरएफच्या शेअरमध्ये घसरण होण्याचं मुख्य कारण ऑटोमोबाईल क्षेत्राचा मंदावलेला वेग आणि गेल्या ४ महिन्यांपासून घसरत असलेला भारतीय शेअर बाजार हे आहे. या घसरणीमुळं एमआरएफचं मार्केट कॅप ४८ हजार कोटी रुपयांवर घसरलं आहे. असं असलं तरी कंपनीनं गेल्या ५ वर्षांत सुमारे ६० टक्के परतावा दिला आहे.
एकेकाळी एमआरएफ शेअर हा देशातील सर्वात महाग शेअर होता. मात्र सध्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानं हा शेअर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. शेअरची सध्याची किंमत १,१२,०९९ रुपये आहे. सध्या एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर पहिल्या क्रमांकावर असून तो देशातील सर्वात महाग शेअर आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या शेअरची सध्याची किंमत १,३७,३५१ रुपये आहे.
एमआरएफच्या कंपनीच्या उभारणीची कहाणी खूपच रंजक आणि प्रेरक आहे. फुगे बनवण्यापासून सुरू झालेला हा प्रवास टायर उत्पादनापर्यंत कसा आला आणि या कंपनीच्या शेअरनं देशातील सर्वात महागडा शेअर हे बिरुद कसं मिळवलं हे जाणून घ्यायला हवं.
कंपनीचे संस्थापक के.एम. ममेम मपिल्लई (K. M. Mammen Mappillai) फुगे बनवायचे. मॅपिल्लई यांनी १९४६ मध्ये व्यवसायाला सुरुवात केली. मद्रासमधील तिरुवोट्टियूर इथं एका छोट्या शेडमध्ये त्यांनी फुगे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. ते मुख्यतः लहान मुलांची खेळणी, कारखान्यांमध्ये वापरले जाणारे हातमोजे आणि लेटेक्स उत्पादनं तयार करत. कालांतरानं, त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आणि पुढं जाण्यासाठी त्यांनी १९५२ मध्ये मद्रास रबर फॅक्टरी (MRF) ची स्थापना केली. ट्रेड रबर निर्मितीच्या व्यवसायात प्रवेश केल्यानंतर अवघ्या ४ वर्षांच्या आत कंपनीची झपाट्यानं वाढ झाली आणि १९५६ पर्यंत कंपनीनं भारतातील ट्रेड रबरचा ५० टक्के व्यवसाय ताब्यात घेतला.
५ नोव्हेंबर १९६१ रोजी एमआरएफला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा दर्जा मिळाला. तोपर्यंत कंपनी मॅन्सफिल्ड टायर आणि रबर कंपनीच्या सहकार्यानं ऑटोमोबाईल, विमान आणि सायकलींसाठी टायर आणि ट्यूब तयार करत होती. १९६५ मध्ये कंपनीनं आपल्या पहिल्या परदेशी उपक्रमाद्वारे अमेरिकेत (यूएस) टायर निर्यात करण्यास सुरुवात केली. ८० च्या दशकात भारतीय ऑटो क्षेत्रात मोठा बदल झाला, परवडणाऱ्या कार आल्या. मारुती ८०० हे त्याचं उदाहरण. वाहन क्षेत्रातील बदलाबरोबर दुचाकी उद्योगालाही गती मिळाली होती. १९८५ मध्ये एमआरएफनं दुचाकींसाठी टायर बनवण्यास सुरुवात केली. १९९३ पर्यंत हा व्यवसाय प्रस्थापित झाला आणि आता ही कंपनी ट्रक, कार, बाईक-स्कूटरसाठी टायर बनविण्यात आघाडीवर आहे.
दोन दशकांपूर्वी ६ ऑगस्ट २००४ रोजी MRF शेअरची किंमत १५४८ रुपये होती. हळूहळू ती वाढत जाऊन या शेअरनं २०१० पर्यंत ५ हजारचा टप्पा ओलांडला. त्यानंतर २०१२ मध्ये त्याची किंमत १०,००० रुपयांच्या पुढं गेली आणि २०१५ मध्ये, ७ ऑगस्ट २०१५ पर्यंत शेअर ४४,९२२ रुपयांपर्यंत पोहोचला. यानंतर या शेअरनं विक्रमी वाढीचे नवे विक्रम प्रस्थापित केले. जानेवारी २०२४ मध्ये प्रथमच १.५० लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता, जो शेअरचा सर्वकालीन उच्चांक देखील आहे.
संबंधित बातम्या