मोबिक्विकचा आयपीओ आला, पहिल्याच दिवशी १०० टक्के सबस्क्राइब झाला! करू शकतो मालामाल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  मोबिक्विकचा आयपीओ आला, पहिल्याच दिवशी १०० टक्के सबस्क्राइब झाला! करू शकतो मालामाल

मोबिक्विकचा आयपीओ आला, पहिल्याच दिवशी १०० टक्के सबस्क्राइब झाला! करू शकतो मालामाल

Dec 11, 2024 01:57 PM IST

MobiKwik IPO News : नव्या पिढीत लोकप्रिय असलेली फिनटेक कंपनी मोबिक्विकचा आयपीओ आजपासून खुला झाला असून त्यास जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

मोबिक्विकचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला, पहिल्याच दिवशी १०० टक्के सबस्क्राइब
मोबिक्विकचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला, पहिल्याच दिवशी १०० टक्के सबस्क्राइब

Stock Market News Today : ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म मोबिक्विकचा आयपीओ बुधवार, ११ डिसेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. आयपीओ उघडताच त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो १०० टक्के सब्सक्राइब झाला. फिनटेक कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून ५७२ कोटी रुपये उभे करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आयपीओसाठी दरपट्टा २७९ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.

जीएमपी किती?

मोबिक्विक आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम मजबूत लिस्टिंगचे संकेत देत आहे. Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, मोबिक्विकचे शेअर्स १३६ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. हा कल पाहता हे शेअर्स ४१५ रुपयांपर्यंत लिस्ट होऊ शकतात. प्राइस बँडच्या तुलनेत ही वाढ ४८.७५ टक्के असेल. ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) ही आयपीओ शेअर्सची अधिकृत किंमत नसते. ती सट्टेबाजीवर आधारित असते. वास्तविक लिस्टिंग किंमत जीएमपीपेक्षा वेगळी असू शकते. कंपनीचे शेअर्स १८ डिसेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होऊ शकतात.

हा आयपीओ बुधवार, १३ डिसेंबरपर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला राहणार आहे. गुंतवणूकदार किमान ५३ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ५३ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. 

का आणला जातोय आयपीओ?

हा आयपीओ ५७२ कोटी रुपयांचा पूर्णपणे नवीन इश्यू आहे आणि त्यात ऑफर फॉर सेलचा समावेश नाही. या आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या निधीपैकी १५० कोटी रुपयांचा वापर वित्तीय सेवा व्यवसायाच्या वृद्धीसाठी केला जाणार आहे. पेमेंट सर्व्हिसेस व्यवसायाच्या वृद्धीसाठी १३५ कोटी रुपये, डेटा, एमएल, एआय आणि उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासासाठी १०७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. याशिवाय ७०.२८ कोटी रुपये भांडवली खर्च, पे, पेमेंट डिव्हाइस, व्यवसाय आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूसाठी वापरले जातील.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner