IPO Listing News in Marathi : फिनटेक कंपनी वन मोबिक्विक सिस्टीम्सचा आयपीओ बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची चांगली लिस्टिंग झाली आहे. वन मोबिक्विक सिस्टीम्स लिमिटेडचा शेअर बीएसईवर २७९ रुपयांच्या आयपीओ किमतीच्या तुलनेत सुमारे ५९ टक्के प्रीमियम असलेल्या ४४२.२५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. एनएसईवर हा शेअर ६१ टक्के प्रीमियमसह ४४९ रुपयांवर लिस्ट झाला.
हा आयपीओ ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. त्यास गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीन दिवसांत हा इश्यू सुमारे १२५ वेळा सबस्क्राइब झाला होता.
एनएसईच्या आकडेवारीनुसार, ५७२ कोटी रुपयांच्या या आयपीओमध्ये १,१८,७१,६९६ शेअर्स विक्रीसाठी जारी करण्यात आले होते. प्रत्यक्षात एकूण १,४१,७२,६५,६८६ शेअर्ससाठी बोली लागली होती. किरकोळ गुंतवणूकदार (RII) श्रेणीत हा आयपीओ १३४.६७ पट, तर पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत ११९.५० पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत १०८.९५ पट सब्सक्राइब झाला होता. या कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून २५७ कोटी रुपये उभे केले होते. आयपीओसाठी २६५ ते २७९ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता.
नवीन इश्यूमधील १५० कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक वित्तीय सेवा व्यवसायाच्या वाढीसाठी केली जाईल, पेमेंट सर्व्हिसेस व्यवसायाच्या वाढीसाठी १३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. डेटा, एमएल, एआय आणि उत्पादनं आणि तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासासाठी १०७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. ७०.२८ कोटी रुपये भांडवली खर्च, पे, पेमेंट डिव्हाइस, व्यवसाय आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूसाठी वापरले जातील.
यापूर्वी हा आयपीओ पुढं ढकलण्यात आला होता. हा दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी कंपनीनं जुलै २०२१ मध्ये आयपीओ लाँच करण्याची योजना आखली होती, परंतु बाजारातील प्रतिकूल परिस्थितीमुळं कंपनीनं आपला प्लान पुढं ढकलला होता आणि मसुदा कागदपत्रे मागे घेतली होती.
संबंधित बातम्या