Share market news today : आयपीओ आल्यापासूनच प्रचंड हवा असलेला बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर आज अखेर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. हा शेअर ११४ टक्क्यांनी वाढून लिस्ट झाल्यामुळं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. त्यामुळं ज्यांना आयपीओ लागला नाही, त्यांची निराशा झाली आहे. मात्र, तज्ज्ञांनी अशा गुंतवणूकदारांना निराश न होण्याचा सल्ला दिला आहे.
आयपीओ प्राइस प्रति शेअर ७० रुपये असलेला बीएचएफएलचा शेअर १५० रुपयांवर पोहोचला आहे. तो ११४ टक्के वाढून सूचीबद्ध झाला. त्यामुळं आयपीओ लागलेले गुंतवणूकदार खूश झाले आहेत. मात्र, ज्यांना आयपीओ लागला नाही त्यांनी थोडी वाट पाहावी, असं सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. लिस्टिंगच्या दिवशी आलेल्या लाटेवर स्वार होण्याची गरज नाही. त्यापेक्षा पुढचे ६ महिने किंवा एक वर्षानंतर गुंतवणूक करणं उत्तम राहील, असं विश्लेषण 'मिंट'नं केलं आहे.
'मिंट'नं यासाठी २०२१ या वर्षाचा दाखला दिला आहे. २०२१ मध्ये एकूण ६४ शेअर सूचीबद्ध झाले होते. त्यातील ४६ आयपीओ शेअर बाजारात प्रीमियमवर लिस्ट झाले. हे आयपीओ न लागलेल्या गुंतवणूकदारांनी वर्षभर थांबून नंतर त्यात गुंतवणूक केली. या गुंतवणूकदारांना ४६ शेअर्सपैकी ६७ टक्के शेअरनी चांगला परतावा दिला. थोडक्यात, या शेअर्सनी लिस्टिंगनंतर चांगली कामगिरी केली होती. यंदा आतापर्यंत सूचीबद्ध झालेल्या ५१ शेअर्सपैकी जवळपास ८० टक्के शेअर्सनी गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिला आहे.
२०२१ मध्ये पदार्पणातच शेअर्सनी नोंदवलेला नफा २९.२ टक्के होता. यंदा आतापर्यंत हा फायदा ३१.२ टक्के आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सव्यतिरिक्त विभोर स्टील ट्यूब्स, बीएलएस ई-सर्व्हिसेस, युनिकॉमर्स ईसोल्यूशन्स आणि प्रीमियर एनर्जी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ८० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
ज्या शेअर्सची किंमत ट्रेडिंगच्या पहिल्याच दिवशी दुप्पट झाली, त्यांच्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन सकारात्मक आहे. यापैकी सुमारे दोन तृतीयांश शेअर्सनी वर्षभरानंतरही किंवा काही बाबतीत सहा महिन्यांनंतरही दमदार परतावा दिला आहे. उदाहरणार्थ, सिंगापूरची इंडस्ट्रीजमध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये सूचीबद्ध झाल्यानंतर १२ महिन्यांनंतर ९४.८ टक्के वाढ झाली. मात्र, आता हा शेअर लिस्टिंग किंमतीपेक्षा ६.६ टक्के घसरून व्यवहार करत आहे. जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्समध्ये लिस्टिंगनंतर १२ महिन्यांत २९.६ टक्के वाढ झाली, परंतु त्यानंतर लिस्टिंग किमतीपासून हा शेअर ७.५ टक्क्यांनी घसरला आहे.
राइट रिसर्चच्या संस्थापक आणि फंड मॅनेजर सोनम श्रीवास्तव म्हणाल्या, 'आतापर्यंतची आकडेवारी सांगते की आयपीओची हुकलेली संधी पुन्हा साधण्यासाठी संयमी दृष्टिकोन चांगला ठरतो. आयपीओनंतर शेअरच्या किमतीत होणारी सुरुवातीची वाढ अनेकदा प्रचार आणि बेभान गुंतवणुकीमुळं होते, परंतु जसजसं वातावरण थंड होतं आणि गुंतवणूकदार कंपनीच्या मजबुतीवर अधिक लक्ष देतात, तेव्हा शेअरची किंमत स्थिरावते. अशा वेळी गुंतवणूकदारांना योग्य मूल्यांकनावर शेअरमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळू शकते, असं श्रीवास्तव म्हणाल्या.
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या बाबतीत मजबूत ब्रँड, भक्कम आर्थिक स्थिती आणि बाजारातील अनुकूल परिस्थितीमुळं कंपनीच्या दमदार पदार्पणाला हातभार लावला. परंतु बऱ्याचदा सुरुवातीची किंमत भावनिक आणि झटपट श्रीमंतीच्या अपेक्षांमुळे वाढते. हे सगळं शांत होण्यासाठी एक वर्ष वाट पाहिल्यास गुंतवणूकदार अल्पमुदतीच्या किंमतीतील चढ-उतारांचा धोका कमी करू शकतात. अधिक योग्य किंमतीत शेअर्स खरेदी करू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.
पीएल इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे कॉर्पोरेट फायनान्सचे संचालक निपुण लोढा म्हणाले, ‘आयपीओचा सुरुवातीचा उत्साह मोहक असला, तरी गुंतवणूकदारांनी झटपट नफ्याऐवजी दीर्घकालीन वाढीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आयपीओ गुंतवणुकीसाठी संयमाची गरज असते आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा तोच राजमार्ग आहे. भविष्यातही नुतनीकृत ऊर्जा, पुनर्वापर, पायाभूत सुविधा, फिनटेक आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सारख्या क्षेत्रांमध्ये उच्च-गुणवत्तेच्या कंपन्या बाजारात येताना दिसतील. त्यामुळंच केवळ आयपीओच्या लोकप्रियतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, संयमी दृष्टीकोन आणि कंपनीच्या मूलभूत गोष्टींचं सखोल मूल्यमापन करून गुंतवणुकीची जोखीम कमी करणं महत्त्वाचं आहे.’