अशी काय जादू झाली? अवघ्या सहा दिवसांत १०० टक्क्यांनी वाढला 'या' चिमुकल्या कंपनीचा शेअर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अशी काय जादू झाली? अवघ्या सहा दिवसांत १०० टक्क्यांनी वाढला 'या' चिमुकल्या कंपनीचा शेअर

अशी काय जादू झाली? अवघ्या सहा दिवसांत १०० टक्क्यांनी वाढला 'या' चिमुकल्या कंपनीचा शेअर

HT Marathi Desk HT Marathi
Nov 13, 2024 05:31 PM IST

Tera Software share price : टेरा सॉफ्टवेअर या चिमुकल्या शेअरमध्ये मागच्या केवळ सहा दिवसांत १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मल्टीबॅगर स्टॉक प्रकाश इंडस्ट्रीज
मल्टीबॅगर स्टॉक प्रकाश इंडस्ट्रीज

Tera Software share price : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टेरा सॉफ्टवेअरच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी कंपनीच्या शेअरनं पुन्हा एकदा १० टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं आणि शेअरची किंमत १५५.०५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. गेल्या अवघ्या सहा दिवसांत शेअरनं गुंतवणूकदारांना १०० टक्के नफा मिळवून दिला आहे. एका करारामुळं ही जादू झाली आहे.

टेरा सॉफ्टवेअरनं नुकताच सरकारी कंपनी आयटीआय लिमिटेडसोबत करार केला आहे. या करारानुसार, टेरा सॉफ्टवेअर ही कंपनी भारतनेट प्रकल्पाच्या मिडल माइल नेटवर्क फेज ३ साठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. यात तीन पॅकेजेसचा समावेश आहे. पहिले पॅकेज हिमाचल प्रदेश (पॅकेज क्रमांक ८), पश्चिम बंगाल आणि अंदमान-निकोबार बेटांसाठी (पॅकेज क्रमांक ९) प्रकल्प आहे. त्याची एकूण ऑर्डर व्हॅल्यू ३०२२ कोटी रुपये आहे. टेरा सॉफ्टवेअर ही एकमेव कंपनी पहिल्या टप्प्यापासून भारतनेट प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे.

शेअरची वाटचाल कशी?

मायक्रो कॅप कंपनी टेरा सॉफ्टवेअरच्या शेअरनं गुंतवणूकदारांना घसघशीत नफा मिळवून दिला आहे. मागच्या अवघ्या तीन दिवसांत या शेअरमध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सहा दिवसांत हा शेअर १०२ टक्क्यांनी वधारला आहे. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअरचा भाव फक्त ७६.७२ रुपये होता. त्यानंतर आठवडाभरात या शेअरनं दुपटीहून अधिक नफा दिला आहे. सहा महिन्यात या शेअरनं २२५ टक्के रिर्टन दिले आहेत. तर वर्षभरात २५० टक्क्यांहून जास्त परतावा दिला आहे.

भारतनेट प्रकल्प नेमका आहे काय?

भारतनेट प्रकल्पाला दूरसंचार विभागांतर्गत डिजिटल इंडिया फंड (USOF) द्वारे निधी देण्यात आला आहे. भारतातील सर्व ग्रामपंचायती आणि गावांना १०० एमबीपीएसच्या बँडविड्थसह हायस्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात भारतातील सर्व ६,४०,००० गावं, ब्लॉक आणि ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटीनं जोडण्यात येणार आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner