Threads : 'थ्रेड्स'चे विणकाम जोरात! एका आठवड्यात मिळाले 'इतके' कोटी युजर्स; ट्विटरच्या साम्राज्याला हादरा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Threads : 'थ्रेड्स'चे विणकाम जोरात! एका आठवड्यात मिळाले 'इतके' कोटी युजर्स; ट्विटरच्या साम्राज्याला हादरा

Threads : 'थ्रेड्स'चे विणकाम जोरात! एका आठवड्यात मिळाले 'इतके' कोटी युजर्स; ट्विटरच्या साम्राज्याला हादरा

Updated Jul 10, 2023 04:24 PM IST

Threads Vs Twitter : मेटा कंपनीनं आणलेल्या नव्या ‘थ्रेड्स अ‍ॅप’नं ट्विटरच्या साम्राज्याला हादरा दिला आहे.

Threads
Threads

Threads shocks Twitter : मार्क झुकरबर्ग यांच्या 'मेटा' कंपनीनं आणलेल्या ‘थ्रेड्स अ‍ॅप’नं मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरच्या साम्राज्याला मोठा दणका दिला आहे. लाँच झाल्यानंतर आठवडाभरातच या अ‍ॅपनं १० कोटी युजर्स मिळवले आहेत. ट्विटरसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर धोरणं बदलून आणि नवे नियम आणून युजर्सना हैराण करून सोडलं होतं. मात्र, ट्विटरची उपयुक्तता लक्षात घेऊन युजर्सनी हे सगळं सहन केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर 'मेटा'नं थ्रेड्स अ‍ॅप आणून ट्विटरला पर्याय दिला आहे. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. लाँच झाल्यापासूनच हे अ‍ॅप ग्राहक नोंदणीचे नवनवे विक्रम करत आहे. हे अ‍ॅप इन्स्टाग्रामला जोडलेलं असल्यानं ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. थ्रेड्सच्या वेगवान प्रसाराचं ते एक प्रमुख कारण मानलं जात आहे. इन्स्टाग्रामचे महिन्याचे युजर्स सुमारे २३५ कोटी इतके आहेत.

ChatGPT आणि TikTok लाही मागे टाकले!

‘थ्रेड्स'च्या सेवेसाठी साइन अप करणाऱ्यांचा आकडा कळावा म्हणून संबंधित युजरचे अकाउंट Instagram ला तात्पुरतं जोडलं जात आहे. त्यामुळं थ्रेड्सच्या नव्या युजर्सना नेमका आकडा सहज माहीत होत आहे. ‘थ्रेडस’च्या वापरकर्त्यांची सध्याची संख्या १० कोटी ५ हजार १०३ पेक्षा जास्त आहे. १० कोटी युजर्सचा टप्पा पार करण्याच्या बाबतीत थ्रेड्सनं ChatGPT आणि TikTok ला देखील मागे टाकलं आहे. चॅटजीपीटीनं दोन महिन्यांत, तर टिकटॉकनं ९ महिन्यांत १० कोटींचा टप्पा पार केला होता. इंस्टाग्रामनं अडीच वर्षांत १० कोटी युजर्स मिळवले होते.

अनेक बाबतीत मागे

‘थ्रेड्स’ झपाट्यानं लोकप्रिय होत असलं तरी ट्विटर आणि मास्टोडनवर आढळणाऱ्या अनेक फिचर्स त्यावर अद्याप नाहीत. यात खासगी संदेश व फंक्शनल सर्च हे फीचर आहेत. कंपनी आता युजर्सना गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून Android वर थ्रेड्स अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनची चाचणी घेण्याची आणि नवीन फीचर्स वापरून पाहण्यासाठी साइन अप करण्याची परवानगी देत ​​आहे.

हा धोका लक्षात घ्या!

इन्स्टाग्राम व थ्रेड एकमेकांना जोडलेलं असल्यामुळं आपण थ्रेड अकाउंट डीअ‍ॅक्टिव्हेट केल्यास इन्स्टाग्राम खाते देखील डीअ‍ॅक्टिव्हेट होणार आहे. अर्थात, स्वतंत्रपणे थ्रेड्स अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह करता यावं यासाठी कंपनी काम करत असल्याचं इंस्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांनी सांगितलं आहे.

ट्विटरमध्ये अस्वस्थता

'थ्रेड्स'च्या आक्रमक रणनीतीमुळं ट्विटरमध्ये अस्वस्थता आहे. मस्क यांनी मेटावर कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. थ्रेड्सवर एका आठवड्यात १० कोटी युजर आले असले तरी किती लोक सक्रिय राहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. क्लाउडफ्लेअरचे सीईओ मॅथ्यू प्रिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ट्विटरच्या DNS रँकिंगमध्ये घसरण झाली आहे.

Whats_app_banner