भारत आज जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून गणला जातो. भारतात दूध क्षेत्रात आलेल्या श्वेतक्रांतीद्वारे हे शक्य झाले आहे. भारतात १९५०-५१ साली १७ दशलक्ष टन असलेले दूध उत्पादन व्हायचे. आता २०२२-२३ हे उत्पादन २३०.५८ दशलक्ष टन एवढे झाले आहे. फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायजेशनच्या अंदाजानुसार २०२३-२४ या वर्षात भारतात दुधाचे उत्पादन २.५ टक्क्याने वाढून २३६.३५ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. श्वेतक्रांतीमुळे भारताचा जागतिक दूध उत्पादनातील वाटा २४ टक्क्यापेक्षा जास्त झाला आहे. यातील १२६ दशलक्ष लिटर दुधावर प्रतिदिन प्रक्रिया केली जाते. जीडीपीमध्ये डेअरी क्षेत्राचा ५ टक्के योगदान असून देशात डेअरी उद्योगात सुमारे ८० दशलक्ष लोकांना रोजगार मिळतो.
दूध उत्पादन क्षेत्रात अनेक बदल होत असले तरी या उद्योगासमोरील आव्हाने सुद्धा मोठी आहेत. देशाची वाढती लोकसंख्या, प्रोटिनचा स्रोत म्हणून दुधाचा सर्वाधिक प्रमाणात होत असलेला वापर आणि समाजात पोषणाबाबत वाढती जागरूकता यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते आहे. परंतु त्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी संघर्षही करावा लागतो आहे. त्यामुळे दुधाची उत्पादकता हा प्रमुख मुद्दा बनला आहे. अमेरिकेत एक संकरित गाय दररोज जवळपास ३० लिटर दूध देते. त्या तुलनेत भारतातील विदेशी किंवा संकरित गाय ही दररोज फक्त ८.५२ लिटर दूध देत असते. उत्पादन क्षमतेतील ही तफावत दुधाच्या किमतीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. जनावराच्या खाद्याच्या किमती वाढल्या असून गेल्या वर्षभरात यात १५ टक्के वाढ झाली आहे.
दूध उत्पादन क्षेत्रातील या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतात आता श्वेतक्रांती 2.0 ची गरज आहे. अशावेळी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दूध उत्पादकतेचे संकट सोडवता येणार आहे. यात भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञानाद्वारे उच्च अनुवांशिक गुणवत्तेच्या गाईपासून जन्मलेल्या वासरांची वाढ करून प्रजनन परिणाम सुधारू शकते. नैसर्गिक प्रजनन पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देत नैसर्गिक प्रजननाच्या ५० टक्क्याच्या तुलनेत मादी वासरांच्या जन्माची शक्यता ९० टक्क्यापर्यंत वाढवू शकतो. प्राण्यांच्या पुनरुत्पादक चक्रावर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल साधने तसेच सेन्सरच्या मदतीने गर्भादान यशाचा दर ३५-४० टक्क्यावरून ७० टक्क्यापर्यंत वाढवू शकतो.
भारताच्या उत्पादकतेचे कोडे सोडवण्यासाठी आपल्याला गर्भाधान तंत्राच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागणार आहे. जनावरांच्या खाद्यात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे. भारतात ७० दशलक्ष टन पशु खाद्याची गरज असताना केवळ १५ दशलक्ष टन पशु खाद्याचे उत्पादन होते. देशात ताजा, हिरव्या चाऱ्याचे (११.२४-३२ टक्के) आणि कोरडा चाऱ्याच्या (२३ टक्के) उत्पादनात लक्षणीय तूट दिसून येते. याशिवाय पशुंच्या पोषण आव्हानावर मात करण्यासाठी सायलेज हा एक चांगला उपाय आहे. यूएसडीएच्या अंदाजानुसार, दर्जेदार सायलेज खाऊ घातल्यास गायीला आवश्यक उर्जेची निम्मी गरज ते पूर्ण करू शकते. तथापि, सायलेज उत्पादनासाठी अधिक जमीन आवश्यक आहे, तर चारा उत्पादनासाठी पडीक जमिनीचा शोध घेणे आवश्यक आहे.
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सरकार, सहकारी संस्था आणि खासगी क्षेत्र यांच्यातील सहयोगात्मक प्रयत्नांची आवश्यकता असते. या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करूनच भारत दूध उत्पादकतेच्या आव्हानांवर मात करू शकतो. दुग्धव्यवसायातील आपले यश असेच पुढे सुरू ठेवत भारत हा जगातला ‘दूध-सुरक्षित' देशातून ‘अतिरिक्त दूध असलेला’ देश बनू शकतो. आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि सुधारित पशू पोषण आहार यांचा एकत्रित दृष्टिकोन भारताला दुग्धव्यवसाय क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि डेअरी क्षेत्रात जागतिक स्तरावर लीडर म्हणून आपले स्थान टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो.