mazagon dock shipbuilders split : संरक्षण क्षेत्रातील चर्चेतील कंपनी असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं गुंतवणूकदारांना खूषखबर दिली आहे. कंपनीनं अंतरिम लाभांश जाहीर केला असून त्यासाठीची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. तसंच, ही कंपनी शेअरच्या विभाजनही (Stock Split) करण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज कंपनीचे शेअर चांगलेच वधारले आहेत.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं गुरुवारी शेअर बाजाराला कंपनीच्या निर्णयांची माहिती दिली आहे. त्यानुसार अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड डेट बुधवार, ३० ऑक्टोबर २०२४ निश्चित करण्यात आली आहे. पात्र गुंतवणूकदारांना शेअरवर किती अंतरिम लाभांश दिला जाईल, हे कंपनीनं अद्याप सांगितलेलं नाही. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याच दिवशी कंपनी अंतरिम लाभांशांची रक्कम आणि शेअर विभाजनाबाबत निर्णय घेणार आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी दरवर्षी गुंतवणूकदारांना लाभांश देत असते. चालू आर्थिक वर्षांत कंपनीनं घोषित केलेला हा दुसरा अंतरिम लाभांश आहे. याआधी कंपनीनं १९ सप्टेंबर २०२४ रोजी एक्स-डिविंडड स्टॉक म्हणून व्यवहार केला होता. कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर १२.११ रुपये लाभांश दिला होता. त्याआधी २० नोव्हेंबर २०२३ रोजी एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार केला होता. त्यावेळी कंपनीनं प्रत्येक शेअरवर १५.३४ रुपये लाभांश दिला होता.
गेल्या ६ महिन्यांत या स्टॉकनं गुंतवणूकदारांना जवळपास १०० टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या महिनाभरात शेअरच्या किंमतीती बरेच चढ-उतार आले आहेत. या काळात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसईवर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५८५९.९५. रुपये आणि कंपनीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १७४२ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ८५,५२३.६२ कोटी रुपये आहे. या कंपनीत सरकारचा हिस्सा ८४.४० टक्के आहे.
एनएसईवर हा शेअर आज ४३०७.१५ रुपयांवर उघडला. पण काही काळानंतर मोठी उसळी घेतली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेअर ४.६७ टक्क्यांनी वाढून ४४३५.६५ रुपयांवर ट्रेड करत होता.
संबंधित बातम्या