गेल्या दशकभरात भारतातून होणाऱ्या निर्यातीत विक्रमी वाढ झाली असून ऐतिहासिक उच्चांकी पातळीला पोचली आहे. पुढील दशकातही हा वेग टिकून राहण्याची चिन्हे आहेत. भारतात व विशेषतः महाराष्ट्रात निर्य़ातीस अनुकूल अशा महत्त्वाच्या घडामोडी घडत असून त्या संधींचा फायदा मराठी व्यावसायिक व उद्योजकांनी वेळीच घ्यावा, असे आवाहन दुबईस्थित ‘अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकतेच मुंबईत एका कार्यक्रमात केले.
‘मिती ग्रुप’तर्फे आयोजित ‘महाराष्ट्र बिझनेस एन्क्लेव्ह २०२५’ परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माटुंग्यातील ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील नामवंत तसेच नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.
भारतीय अर्थव्यवस्था पुढील दोन-तीन वर्षांत ५ लाख कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट असून त्यात निर्यातीचा महत्त्वाचा वाटा असेल, असे सांगून डॉ. दातार म्हणाले, ‘सरकारने निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. नवे परकीय व्यापार धोरण अस्तित्वात आले आहे. उद्योग-व्यवसाय-व्यापार यासाठी गरजेच्या पायाभूत सुविधांचा दहा वर्षांपूर्वी हाती घेतलेला विकास पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे वस्तू व सेवांची देशांतर्गत उलाढाल, तसेच परदेशांना निर्यात आगामी काळात अनेकपटींनी वाढणार आहे. इंडिया-मिडल इस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसारखा (आयएमइइसी) प्रकल्प दशकभरात साकारला तर भारतातून युरोपला होणाऱ्या निर्यातीचा कालावधी निम्मा होईल आणि खर्चही वाचेल. देशातील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे तर महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग प्रकल्पही पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. नवी मुंबई येथे नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे. नुकताच जाहीर झालेला वाढवण बंदर व आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक निर्य़ातीत अग्रेसर बनवणार आहे. हा सर्व विकास येत्या पाच-दहा वर्षांत फलदायी होणार असल्याने मराठी उद्योजकांनी निर्यातीच्या संधी साधायला हव्यात.’ असं दातार म्हणाले.
दातार पुढे म्हणाले, 'दुबईतील ‘जेबेल अली’ बंदराची उभारणी, तसेच नवी मुंबईतील ‘जेएनपीटी’ बंदराची उभारणी झाल्यावर आजूबाजूच्या परिसराचा वेगवान विकास मी पाहिला आहे. आताही वाढवणसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर साकारल्यावर मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या पट्ट्यात विकासाची गंगा जोमाने वाहणार आहे. उद्योजक, व्यावसायिक आणि निर्यातेच्छुक उत्पादक यांनी ही संधी सोडू नये, अन्यथा ‘गंगा दारातून वाहिली, पण अंघोळ करायची राहिली’ अशी हळहळ वाट्याला येईल. नवउद्यमींनी आताच निर्यातीचे प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरू केल्यास दहा वर्षांत तो प्रस्थापित उद्योग बनेल आणि समृद्धीची फळे चाखता येतील. त्याखेरीज मालवाहतूक, बांधकाम, पूरक उद्योग, सामग्री पुरवठा, शीतगृहे, पर्यटन, कृषी उत्पादने प्रक्रिया अशा विविध क्षेत्रांत व्यापार व रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. डॉलरच्या तुलनेत घटलेला रुपया, उत्पादकांना मिळणारा करपरतावा, सरकारची प्रोत्साहक धोरणे या पार्श्वभूमीवर निर्यात उद्योग सुरू करायला सध्याचा काळ अनुकूल आहे. व्यवस्थापन शिक्षण संस्था तसेच व्यापारी संस्थांनी नवउद्योजकांना निर्यातवृद्धीसाठी मार्गदर्शन वाढवले पाहिजे.”
‘मिती ग्रुप’च्या उत्तरा मोने यांनी घेतलेल्या मुलाखतीत डॉ. दातार यांनी आपला उद्योजकीय प्रवास, त्यातील अनुभव व संघर्ष, परदेशी बाजारपेठांचा अभ्यास व त्यानुसार व्यवसायात केलेले बदल विशद केले. परदेशात व्यवसाय करताना येणाऱ्या आव्हानांना कसे तोंड द्यावे, तेथील नियम, कर, धोरणे यांची माहिती कशी करुन घ्यावी याचे मार्गदर्शन त्यांनी केले. परिषदेत जागतिक बाजारपेठेतील संधी, नेतृत्व व संघटन कौशल्य, डिजीटल व्यवसाय व विपणन, व्यवसायातील आर्थिक व्यवस्थापन व शाश्वतता यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरही परिसंवाद झाले.
संबंधित बातम्या