रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर घातलेली बंदी उद्या, १६ मार्च २०२४ पासून अंमलात येणार आहे. त्यामुळं उद्यापासून पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अनेक प्रकारच्या सेवा ठप्प होणार आहेत. मात्र, काही सेवा सुरू राहणार आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेत (Paytm Payments Bank) असलेली रक्कम दुसऱ्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा सल्ला पेटीएमच्या ग्राहकांना देण्यात आला आहे.
पेटीएम बँक वॉलेट किंवा खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत, परंतु शिल्लक रक्कम काढता येईल.
UPI आणि IMPS सेवेद्वारे ग्राहक खात्यात पैसे जमा करू शकणार नाहीत.
पेटीएमचे बँक खाते किंवा वॉलेटद्वारे फास्टॅग किंवा इतर कोणत्याही प्रकारचे टॉप-अप किंवा रिचार्ज करता येणार नाही.
पगार किंवा सरकारी अनुदानाची रक्कम पेटीएमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी दुसरी बँक निवडावी लागेल.
पेटीएम बँक किंवा वॉलेटशी संबंधित QR कोड वापरता येणार नाही.
खाते आणि वॉलेटमध्ये शिल्लक रक्कम असल्यास ते वापरता येईल.
पेटीएम खात्यामध्ये कॅशबॅक, स्वीप-इन किंवा भागीदार बँकांकडून स्वीप-इन व व्याज जमा करण्यास मुभा राहील.
बँक खात्यात शिल्लक पैसे असेपर्यंत वीज बिल, OTT सबस्क्रिप्शन आणि कर्जाचा हप्ता भरता येईल.
पेटीएम पेमेंट्स बँक वॉलेटचा वापर व्यापारी पेमेंटसाठी देखील वैध असेल.
ग्राहकाला वॉलेट बंद करण्याचा किंवा शिल्लक दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय असेल.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नं पेटीएमला UPI मध्ये थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ आता ग्राहक आणि व्यापारी कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेटीएम ॲपवरून UPI पेमेंट करू शकणार आहेत. यासाठी पेटीएमनं ॲक्सिस बँक, एचडीएफ बँक, एसबीआय आणि येस बँकेशी भागीदारी केली आहे. या चार बँका पेटीएमसाठी पेमेंट सिस्टम प्रोव्हायडर म्हणून काम करतील.
शेअर बाजारातील व्यवहारांसाठी जे गुंतवणूकदार पेटीएम पेमेंट्स बँकेचं खातं वापरतात, त्यांना पेटीएम बँकेवरील निर्बंधांचा फटका बसू शकतो. त्यामुळं अशा गुंतवणूकदारांनी Paytm बँक खात्याऐवजी इतर बँकांची खाती आपापल्या ब्रोकरेज कंपन्यांकडं रजिस्टर करावी, असा सल्ला मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) नं दिला आहे.
पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडनं सुमारे २० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी सुरू केली आहे. ही कपात सुरू झाल्याचंही बोललं जातं. कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून विविध विभागांच्या टीमची पुनर्रचना करण्याचे आदेश व्यवस्थापनाने दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक मूल्यमापनाच्या आधारे ही कपात करण्यात येणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेत २५०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.