IPO Listing News : मनबा फायनान्स लिमिटेडच्या शेअरनं बाजारात दणक्यात पदार्पण केलं आहे. मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) हा शेअर २५ टक्के प्रीमियमसह १५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) शेअर १४५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्यामुळं गुंतवणूकदार खूष झाले आहेत.
मनबा फायनान्स लिमिटेडच्या आयपीओसाठी ११४ ते १२० रुपये असा दरपट्टा निश्चित केला होता. ग्रे मार्केटनं २८ टक्क्यांच्या प्रीमियमसह लिस्टिंग होईल असा अंदाज वर्तवला होता. तो पूर्णपणे खरा ठरला नाही. मात्र, या आयपीओनं निराशही केलं नाही. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. बीएसईवर कंपनीचा शेअर ४.९७ टक्क्यांनी वधारून १५७.४५ रुपयांवर पोहोचला. तर, निफ्टीवर कंपनीचे शेअर्स १५२.२५ रुपयांच्या पातळीवर पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत.
केजरीवाल रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक अरुण केजरीवाल यांनी शेअरच्या पुढील वाटचालीबद्दल त्यांचं मत मांडलं आहे. 'मनबा फायनान्सच्या शेअरची किंमत ट्रेड-टू-ट्रेड श्रेणीत सूचीबद्ध झाली आहे. त्यामुळं हा शेअर एका दिशेनं जाण्याची शक्यता असली तरी पुढील दहा सत्रांमध्ये तो सर्किट-टू-सर्किट शेअर्सपैकी एक राहील. या शेअरची रास्त किंमत १६० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळं शॉर्ट टर्म टार्गेट असलेल्या गुंतवणूकदारांनी या पातळीवर प्रॉफिट बूक करून बाहेर पडावं, असा सल्ला अरुण केजरीवाल यांनी दिला आहे.
स्टोक्सबॉक्सच्या रिसर्च अॅनालिस्ट आकृती मेहरोत्रा यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीविषयी भाष्य केलं. 'एनबीएफसी उद्योग दुचाकी, तीनचाकी आणि एमएसएमई कर्जासारख्या क्षेत्रांमध्ये जोरदार वाढीसाठी सज्ज आहे. आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीत मनबाचा एयूएम ३७.५ टक्के सीएजीआरनं वाढून ९३६८.६० दशलक्ष रुपयांवर पोहोचला, तर करोत्तर नफा (PAT) वाढून ३१४.२ दशलक्ष रुपये झाला. १,१०० रुपयांहून अधिक डीलर्ससह ६ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या मनबानं वैयक्तिक, व्यावसायिक आणि वापरलेल्या कार कर्ज क्षेत्रात विस्तार केला आहे.
आरओसीई मार्जिनमध्ये सुधारणा, एनपीएमध्ये घट आणि विस्तार योजना पाहता आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांनी मध्यम ते दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून शेअर होल्ड करण्याचा सल्ला मेहरोत्रा यांनी दिला आहे.
मनबा फायनान्स दुचाकी आणि एमएसएमई कर्जाच्या व्यवसायात आहे. एनबीएफसी उद्योग दुचाकी कर्ज व्यवसायातील ६५ टक्के आणि एमएसएमई कर्ज व्यवसायातील ३५ टक्के हिस्सा काबीज करेल असा अंदाज आहे. त्यामुळं तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन दृष्टीकोन असणारे गुंतवणूकदार मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी हा शेअर ठेवू शकतात. तथापि, भारतीय शेअर बाजारातील तज्ज्ञांनी अल्पकालीन दृष्टिकोन असलेल्या गुंतवणूकदारांना सुमारे १६० रुपयांच्या पातळीवर नफा बुक करण्याचा सल्ला दिला.