मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Maldives news : नरेंद्र मोदींवरील टीका मालदीवला पडली महागात, 'या' कंपनीनं दिला झटका

Maldives news : नरेंद्र मोदींवरील टीका मालदीवला पडली महागात, 'या' कंपनीनं दिला झटका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 08, 2024 12:47 PM IST

EaseMyTrip boycott Maldives : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणं मालदीवच्या मंत्री मंत्री व अधिकाऱ्यांसह त्यांच्या देशालाही महागात पडलं आहे.

Maldives Vs India
Maldives Vs India

India vs Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंत्र्यांना मालदीव सरकारनं बडतर्फ केल्यानंतरही या टीकेचे पडसाद उमटत आहेत. या एका घटनेमुळं मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय कंपन्याही आता मालदीवच्या विरोधात उतरल्या आहेत. देशातील सर्वात मोठी ट्रॅव्हल आणि टुरिझम कंपनी EaseMyTrip नं मालदीवला जाणारी सर्व विमान उड्डाणं रद्द केली आहेत.

इज माय ट्रिपचे सहसंस्थापक निशांत पट्टी यांनी सोशल मीडिया अकाउंट 'X' वर या संदर्भात भाष्य केलं आहे. 'इज माय ट्रिपनं देशासाठी मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द केलं आहे. 

भारतातून हजारो पर्यटक मालदीवला भेट देत असतात. मात्र, मालदीवच्या नव्या सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनतेमध्ये संताप आहे. सोशल मीडिया अकाउंटवर लोक #ChaloLakshadweep आणि BoycottMaldives अशी मोहीम चालवत आहेत. त्या जनभावनेची दखल घेऊन इज माय ट्रिपनं उड्डाणं रद्द केली आहेत.

काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्याची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती. तसंच, लोकांना या बेटाला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. मालदीवचे काही मंत्री व अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर मोदींच्या लक्षद्वीप सहलीच्या छायाचित्रांची खिल्ली उडवली होती. अनेकांनी त्या छायाचित्रांची तुलना मालदीवशी केली होती. लक्षद्वीपला मालदीवसारखं व्हायला खूप वेळ लागेल, असं या मंत्र्यांनी म्हटलं होतं. यानंतर भारतीय इंटरनेट युजर्सनी त्यांच्यावर बरीच टीका केली. त्यानंतर मंत्री शियुना यांनी आपली पोस्ट काढून टाकली. मालदीव सरकारनं ही टिप्पणी करणाऱ्या मंत्र्यांना बडतर्फ केलं.

मालदीवमधील विरोधी पक्षानं सरकारला घेरलं!

मंत्र्याच्या पीएम मोदीविरोधी वक्तव्यानंतर मालदीवमध्येच निदर्शने सुरू झाली. मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. मंत्री मरियम शिउना यांनी वापरलेली भाषा योग्य नसल्याचं ते म्हणाले. मालदीवच्या सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी भारत हा प्रमुख सहकारी असल्याचं ते म्हणाले.

सेलिब्रिटीचंही मालदीववर बहिष्कार टाकण्याचं आवाहन

अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी मालदीववर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील यात सहभागी झाले आहेत. 

WhatsApp channel