Adani Hindenburg : २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आला. यात गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांवर मनमानी कारभार केल्याचा आणि शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
नुकतेच अदानी पोर्ट्स या दिग्गज कंपनीचे निकाल आले आणि हिंडेनबर्ग अहवालाबाबतची चिंता पुन्हा डोके वर काढू लागली आहे. अदानी समूहाच्या अदानी पोर्ट्सच्या लेखापरीक्षकाने (आॅडिटर्स) म्हटले आहे की, निकालात अनेक बाबींचा खुलासा करण्यात आलेला नाही आणि कंपनीने घेतलेले अनेक निर्णय, नियम कायदेशीर नियमांच्या पलीकडे आहेत.
अदानी पोर्ट्सचे आॅडिटर डेलाईट हर्स्किन यांच्या म्हणण्यानुसार, गौतम अदानी समुहाची कंपनी अदानी पोर्ट्सने अत्यावश्यक डिस्क्लोजर दिलेले नाहीत. अदानी पोर्ट्स कंपनीने ३ फर्म्ससोबत अनेक आर्थिक व्यवहार केले आहेत. मात्र याबाबतची माहिती कंपनीने दिलेली नाही. हिडेनबर्गच्या अहवालात अदानी समुहातील एका कंपनीने सहयोगी कंपनीसह इंजिनिअरिंग काॅन्ट्रॅक्ट केला होता. त्यासाठी या कंपनीला ४५३ दशलक्ष डाॅलर्स दिल्याचा उल्लेख केला आहे.
यासंदर्भात अदानी पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, हे कंत्राट एका असंबंधित पक्षाला देण्यात आले आहे. यात महत्त्वाची बाब अशी की, या प्रकरणात स्वतंत्र बाह्य मूल्यांकनास नकार देण्यात आला आहे.
अदानी पोर्ट्सने इक्विटी ट्रेडसह अनेक आर्थिक व्यवहार केले आहेत. यात मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की हिंडनबर्ग अहवालात नाव असलेल्या एकाच व्यक्तीसोबत व्यवहार झाला आहे, या प्रकरणात कोणतीही रक्कम देय नाही. लेखापरीक्षकांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अदानी समूहाने या दाव्याचे स्वतंत्र बाह्य लेखापरीक्षण करण्यास नकार दिला आहे.
अदानी पोर्ट्सने अलीकडेच म्यानमार पोर्ट सोलर एनर्जी लिमिटेड नावाच्या कंपनीला विकले आहे. मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की म्यानमार बंदराची किंमत २००० कोटींवरून २०० कोटी रुपये करण्यात आली आहे. गौतम अदानी समूहाने ऑडिटरला सांगितले आहे की बंदर खरेदी करणारी कंपनी आपल्याशी संबंधित नाही, परंतु यानंतरही अदानी समूहाने स्वतंत्र बाह्य मूल्यांकन करण्यास नकार दिला आहे.
लेखापरीक्षकाच्या म्हणण्यानुसार, अदानी पोर्ट्स स्वतंत्र बाह्य मूल्यांकन टाळत आहे, तसेच या तीन कंपन्या कोणत्याही प्रकारे संबंधित नाहीत हे सिद्ध करण्यात अदानी समुह अपयशी ठरत आहेत. अदानी पोर्ट्ससंदर्भात आवश्यक पुरावेही दिले जात नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गौतम अदानी समूहाच्या आर्थिक खुलाशात सावधगिरी बाळगली जात आहे आणि त्यात नक्कीच काहीतरी दडवण्यात येत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या