भारतातून उच्च दर्जाची द्राक्षे निर्यात करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक महिंद्रा अॅग्री सोल्युशन्स लिमिटेड (MASL) ने भारतीय द्राक्षांची जागतिक बाजारपेठेत निर्यातीच्या क्षेत्रात आज २० वर्षांचा महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. २००५ मध्ये महिंद्राने युरोपला पहिल्यांदा द्राक्षांची निर्यात केली होती. महिंद्रा अॅग्री सोल्युशन्सतर्फे सध्या उत्तर अमेरिका, युरोप, चीन, आग्नेय आशिया आणि इतर अनेक देशांमध्ये उच्चतम दर्जाची गुणवत्ता, सुरक्षा मानके आणि शाश्वत पद्धतींसह द्राक्षे पुरवली जातात.
महिंद्रा अॅग्री सोल्युशन्सतर्फे पांढरे बिनबियांची थॉमसन आणि सोनाका, लाल बिनबियांची फ्लेम आणि क्रिमसन तसेच काळी बिनबियांची जंबो आणि शरद द्राक्षांची निर्यात केली जाते. ही द्राक्षे ‘Saboro’ आणि ‘Frukinz’ या ब्रँडखाली उपलब्ध आहेत.
नाशिकमध्ये असलेल्या अत्याधुनिक द्राक्ष पॅक हाऊसच्या सहाय्याने महिंद्रा अॅग्री सोल्युशन्सच्या द्राक्ष व्यवसायाला पाठबळ मिळत असून द्राक्षांच्या कापणीपश्चात व्यवस्थापनासाठी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. २०१९ मध्ये उद्घाटन झालेल्या या पॅक हाऊसमध्ये उत्पादनाचा मागोवा घेणे सुनिश्चित करत पुरवठा साखळी दरम्यान पिकाचा ताजेपणा कायम ठेवत संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित करून द्राक्षांची निवड आणि पॅकिंग केले जाते.
महिंद्रा अॅग्री सोल्युशन्सचा द्राक्ष व्यवसाय नाशिक, बारामती आणि सांगली येथील ५०० हून अधिक शेतकऱ्यांसोबत कार्य करतो. द्राक्ष उत्पादन आणि पिकांची काळजी यामध्ये शेतकऱ्यांना कौशल्य मार्गदर्शन पुरवत या शेतकऱ्यांकडून उच्च गुणवत्तेची टेबल द्राक्षे घेतली जातात. यामध्ये सिंचन आणि शेती पद्धतीत सुधारणा तसेच रासायनिक इनपुट व पाण्याचा कमी वापर यावर भर देण्यात येतो. त्यामुळे द्राक्ष शेतीशी संबंधित कार्बन फूटप्रिंट कमी होतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.
महिंद्रा अॅग्री सोल्युशन्स टेबल द्राक्षांचे उत्पादन आणि व्यवस्थापनाची प्रक्रिया नव्याने परिभाषित करत असतानाच, स्थानिक समुदायाच्या कल्याणासाठी रोजगार निर्मिती आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय भूमिका बजावत आहे.
महिंद्रा अॅग्री सोल्युशन्सच्या २० वर्षांच्या द्राक्ष निर्यातीच्या महत्वपूर्ण टप्प्याबाबत बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश रामचंद्रन म्हणाले, “गेल्या २० वर्षांत आमच्या द्राक्ष व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही साध्य केलेल्या गोष्टींचा अत्यंत अभिमान वाटतो. द्राक्षांसारख्या उच्च मूल्य असलेल्या फळ पिकाद्वारे शाश्वतरीत्या गुणवत्ता, उत्पादनक्षमता आणि शेतकऱ्यांचा नफा वाढवण्याचे ध्येय आम्ही निश्चित केले होते. ही २० वर्षांची वाटचाल संपूर्ण कृषी मूल्यसाखळीच्या परिवर्तनासाठी दिलेल्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आमच्या प्रयत्नांचा परिणाम भारतीय टेबल द्राक्षांचे उत्पादन आणि भारतातून जगातील इतर भागांमध्ये निर्यात करण्याच्या पद्धतीत झालेल्या लक्षणीय सुधारणांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच या प्रदेशातील हजारो लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडणे आम्हाला शक्य झाले याबद्दल आम्हाला धन्यता वाटत आहे.”
महिंद्रा द्राक्ष पॅकहाऊस ६.५ एकर परिसरात ७५ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर उभारलेले आहे. येथे प्रतिदिन ८० मेट्रिक टन द्राक्षांचे पॅकिंग करण्याची क्षमता आहे. या पॅकहाऊसमध्ये १२ प्रीकूलिंग चेंबर्स आणि प्रत्येकी १७० मेट्रिक टन क्षमता असलेली थंड हवेत साठवण करण्याच्या २ कोल्ड स्टोरेज फॅसीलिटी आहेत. यामुळे द्राक्षांचा ताजेपणा टिकून राहतो. प्रति शिफ्ट ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या या द्राक्ष पॅकहाऊसच्या सर्व प्रक्रिया MASL च्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांकडून व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित आणि नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे पॅकहाऊस सातत्याने जागतिक बाजारपेठांसाठी गुणवत्ता, सातत्य, एकसंधता आणि ट्रेसिबिलिटी याची पूर्तता करते.
महिंद्राच्या द्राक्ष पॅकहाऊसमध्ये सर्वत्र ऊर्जा कार्यक्षम LED दिवे बसवले असून कॅप्टिव्ह सोलर पॉवर जनरेशनसाठीची सोय आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी एक प्रणाली कार्यरत असून ती ७ दशलक्ष लिटर पाणी साठवू शकते. इतर शाश्वत उपाययोजनांच्या अंतर्गत, इन-हाऊस सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. या प्रकल्पातून प्यायला नाही पण बागकामासह विविध कारणांसाठी उपयुक्त पाणी पुरवले जाते. या द्राक्ष पॅकहाऊस सुविधेला बीआरसीजीएस (पूर्वीचे British Retail Consortium), फेअरट्रेड, SMETA (SEDEX), ग्लोबल गॅप आणि स्प्रिंग या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, तसेच FSSAI आणि APEDA कडूनही स्थानिक पातळीवर प्रमाणपत्र मिळाले आहे.
येथे शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्थापन, मातीतील आर्द्रता व्यवस्थापन आणि पोषण व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या शेती पद्धतींवर इन-हाऊस तांत्रिक सत्रे आयोजित केली जातात. तसेच तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक मदत पुरवली जाते. शेतकऱ्यांना या शाश्वत पद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता याव्यात यासाठी, MASL कडे नाशिकमध्ये १५ एकरचे विस्तृत डेमो फार्म आहे. येथे नवीन शेती पद्धती आणि द्राक्षांच्या विविध प्रजातींवर चाचण्या घेतल्या जातात आणि त्यातून मिळणारे ज्ञान अधिक चांगल्या प्रतीच्या द्राक्ष उत्पादनासाठी नेटवर्कमधील शेतकऱ्यांसोबत शेअर केले जाते.
संबंधित बातम्या