Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला २३० जागेवर विजय मिळवण्यात यश आले. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येताच शेअर मार्केटमधील कंपन्यांनी आनंद व्यक्त केला. हा निकाल महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हितकारी आणि उत्साहवर्धक ठरेल, अशी प्रतिक्रिया अदील उद्योगसमूहाचे प्रमुख धनंजय दातार यांनी दिली. तर, या निकालामुळे राज्यात राजकीय स्थिरता मिळेल आणि गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम होईल, असे शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचे मत आहे.
'कोणत्याही राज्याची आर्थिक-औद्योगिक प्रगती ही शासकीय धोरणांच्या स्थिरतेवर अवलंबून असते. धोरणे स्थिर राहण्यासाठी तेथील सरकार मजबूत असणे गरजेचे आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे एकविचाराने सरकार काम करणार असल्याने आगामी काळात अस्थिर सरकार, तडजोडीचे सरकार किंवा राष्ट्रपती राजवट अशा आव्हानांचा मुकाबला करावा लागणार नाही तसेच विकास कामासाठी केंद्राच्या निधीचीही कमतरता भासणार नाही, हे खूप आश्वासक आहे, असे मत धनंजय दातार यांनी व्यक्त केले.
'महायुतीच्या गेल्या शासनकाळात महाराष्ट्रात प्रगतीची व्यापक आणि वेगवान पावले पडलेली दिसली आहेत. त्याच दमदार वाटचालीचा पुढचा टप्पा भविष्यकाळातही कायम राहील. समृद्धी महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन, नवे रस्ते व रेलमार्ग बांधणी तथा विद्यमान मार्गांचा विस्तार, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित वाढवण बंदर यासारखे पायाभूत सुविधा विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ततेच्या टप्प्यात आहेत. त्यातील काही महाराष्ट्राइतकेच देशाच्या भरभराटीसाठीही महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक, वाहतूक, आयात-निर्यात, औद्योगिक विकास यांना पुढील पाच वर्षांत जोरदार चालना मिळेल, ज्याचा परिणाम राज्याची आर्थिक भरभराट होण्यावर होईल, असं दातार म्हणाले.
महाराष्ट्रातील मतदारांचा कल हा सध्याच्या सरकारकडेच असल्याचे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार रेल्वे आणि पायाभूत क्षेत्राकडे अधिक लक्ष देतील असं वाटतं, अशी प्रतिक्रिया प्रॉफिटमार्ट सेक्युरिटीजचे हेड ऑफ रिसर्च अविनाश गोरक्षकर यांनी मिन्टला दिली. इन्फ्रा क्षेत्रातील कंपन्या बँकांकडून क्रेडिट लाइनसाठी जातील म्हणून सोमवारी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये अधिक खरेदी दिसू शकते, असे गोरक्षकर म्हणाले.