केबल्स, कंडक्टर्स आणि वायर्सचे उत्पादन करणारी ल्युमिनो इंडस्ट्रीज लवकरच आयपीओ घेऊन येणार आहे. आयपीओच्या माध्यमातून भांडवली बाजारातून एक हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी कंपनीने भांडवली बाजाराची नियामक यंत्रणा सेबीकडे (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) प्राथमिक कागदपत्रे दाखल केली आहेत. सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार कंपनी आयपीओमध्ये ६०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि ४०० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर फॉर सेल (ओएफएस) चा समावेश आहे. आयपीओ लॉंच करण्यापूर्वी कंपनी १२० कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.
आयपीओच्या माध्यमातून मिळणारे ४२० कोटी रुपये कंपनीवर असलेले कर्ज फेडण्यासाठी, १५.०८ कोटी रुपये उपकरणे आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी तसेच विद्यमान उत्पादन सुविधांच्या अंतर्गत विकासासाठी वापरले जाणार आहे. तर निधीचा एक भाग हा सर्वसाधारण कंपनीसाठी ठेवण्यात येणार आहे.
ल्युमिनो ही कंपनी कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल, जॅक्सन, वरोरा कुरनूल ट्रान्समिशन, केजीएन इलेक्ट्रिकल्स, डब्ल्यूआरएस एक्ससीआय (ए) ट्रान्सको, मॉन्टे कार्लो आणि आरएस इन्फ्राप्रोजेक्ट्स सारख्या मोठ्या ईपीसी कंपन्यांना कंडक्टर, पॉवर केबल्स आणि इतर विशेष उत्पादने पुरवते. कंपनीकडून अमेरिका, नेपाळ, बांगलादेश, केनिया, घाना, रवांडा आणि इथिओपिया सारख्या देशांमधील आंतरराष्ट्रीय ग्राहकांना उत्पादने पुरविले जाते. सप्टेंबर २०२४ अखेरीस कंपनीकडे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी एकूण १८०३.५ कोटी रुपयांची ऑर्डर बुक होती.
ईपीसी कंपनीने २०२४ या आर्थिक वर्षात नफ्यात ३४६ टक्के म्हणजे ८६.६ कोटी रुपये नफ्यात वाढ दर्शवली होती. तर गेल्या आर्थिक वर्षात हा नफा १९.४ कोटी रुपये एवढा होता. मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात महसूल ८५.१ टक्क्यांनी वाढून १४०७.३ कोटी रुपये एवढा होता. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा वार्षिक महसूल हा ७६०.२ कोटी रुपये एवढा होता.
संबंधित बातम्या