LTCG STCG Tax news : शेअर मार्केट व म्युच्युअल फंड मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकारनं झटका दिला आहे. भांडवली गुंतवणुकीवरील दीर्घकालीन व अल्पकालीन दोन्ही प्रकारच्या नफ्यावरील करांत वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी करांच्या संदर्भात अनेक घोषणा केल्या. भांडवली नफ्यावरील करांचाही यात समावेश आहे. त्यानुसार, सर्व वित्तीय व बिगर वित्तीय मालमत्तेवरील दीर्घकालीन नफ्यावरील करात २.५ टक्के आणि अल्पकालीन नफ्यावरील करात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे.
भांडवली गुंतवणुकीवरील दीर्घकालीन नफ्यावर याआधी १० टक्के कर आकारला जात होता. तर, अल्पकालीन नफ्यावर हाच कर १५ टक्के होता. मात्र, आता तो अनुक्रमे १२.५ टक्के व २० टक्के करण्यात आला आहे.
दीर्घकालीन व अल्पकालीन भांडवली नफ्यावरील करात वाढ करतानाच दुसरीकडं अर्थमंत्री सीतारामन यांनी गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासाही दिला आहे. भांडवली नफ्यावरील सवलतीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, यापुढं सव्वा लाख रुपयांवरील नफ्यावर कर लागणार आहे. यापूर्वी ही सवलत एक लाख रुपयांपर्यंत होती.
लाँग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन या संकल्पाना कालावाधीशी संबंधित आहेत. एखादी भांडवली गुंतवणूक करून त्यावर नफा मिळवला तर तो भांडवली नफा (Capital Gain) ठरतो. हा नफा एक वर्षाच्या आत मिळवला असेल तर तो अल्पकालीन (Short Term) ठरतो. तर, गुंतवणुकीनंतर एका वर्षानंतर हा नफा कमावला असेल तर तो दीर्घकालीन (Long Term) ठरतो.