मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market : ४ जूननंतर बदलणार शेअर बाजाराची दिशा? सर्वसामान्य गुंतवणूकदारांना तज्ज्ञांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

stock market : ४ जूननंतर बदलणार शेअर बाजाराची दिशा? सर्वसामान्य गुंतवणूकदारांना तज्ज्ञांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

May 30, 2024 04:34 PM IST

share market after LS poll results : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. या निकालानंतर शेअर बाजाराची दिशा काय असेल? तज्ज्ञांना काय वाटतं? पाहा…

४ जूननंतर बदलणार शेअर बाजाराची दिशा? सर्वसामान्य गुंतवणूकदारांना तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला
४ जूननंतर बदलणार शेअर बाजाराची दिशा? सर्वसामान्य गुंतवणूकदारांना तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला

share market prediction after LS poll results : संपूर्ण देशाचं लक्ष सध्या ४ जून या तारखेकडं आहे. या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल येणार आहे. देशावर कोणता राजकीय पक्ष राज्य करेल हे या दिवशी ठरेल. गुंतवणूकदारांचे डोळे निवडणूक निकालाबरोबरच शेअर बाजाराच्या चालीकडंही लागले आहेत. ४ जूननंतर शेअर बाजार दिशा बदलणार का, हा सध्याचा सर्वात चर्चिला जाणारा प्रश्न आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येईल असा अंदाज बहुतेक तज्ज्ञांचा आहे. तसं झाल्यास शेअर बाजार पुन्हा उसळी घेईल अशी अपेक्षा आहे. तर, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यास शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर करेक्शन (घसरण) पाहायला मिळेल, असंही काहींना वाटतं.

कोणत्या परिस्थितीत बाजार कोसळेल?

शेअर मार्केट एक्सपर्ट म्हणतात की, निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्यास स्मॉल कॅप स्टॉक आणि स्मॉल कॅप केंद्री म्युच्युअल फंडांमध्ये मोठी घसरण होऊ शकते. समष्टी ॲडव्हायझर्सचे सह-संस्थापक रवी सरोगी यांनी याबाबत आपलं मत मांडलं आहे. 'अनेक गुंतवणूकदार सध्या रोख रक्कम घेऊन बसले आहेत. निवडणूक निकाल येण्याची वाट ते बघत आहेत. निवडणुकीच्या निकालावर बाजार नेमकी काय प्रतिक्रिया देईल याचा अंदाज बहुतेक तज्ज्ञांना नाही. त्यामुळं योग्य संधीची वाट पाहून नंतर निर्णय घेणं हेच हिताचं आहे, असं सरोगी यांनी सांगितलं.

भाजप सत्तेतून गेल्यास काय होईल?

इन्व्हेस्टेट पीएमएसचे रिसर्च हेड अनिरुद्ध गर्ग यांच्या म्हणण्यानुसार, भाजपला मजबूत बहुमत मिळाल्यास बाजाराची प्रतिक्रिया सकारात्मक असेल. मात्र, जर भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यास बाजारात अनिश्चितता आणि अल्पकालीन अस्थिरता निर्माण होईल. 'बिगर-भाजप सरकार अनपेक्षितपणे सत्तेवर आल्यास २००४ प्रमाणे बाजारात घसरण पाहायला मिळेल, असं गर्ग म्हणाले.

रेलिगेअर ब्रोकिंगचे रिटेल रिसर्चचे एसव्हीपी रवी सिंग म्हणाले की, जर मोदी सरकारला पुन्हा एकदा मजबूत बहुमत मिळाल्यास शेअर बाजारातून अनुकूल प्रतिक्रिया मिळण्याची अपेक्षा आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावं?

गुंतवणूकदारांनी अशा वातावरणावर फार लक्ष केंद्रित करू नये. गुंतवणूकदारांनी केवळ त्यांचं दीर्घकालीन लक्ष्य पाहावं आणि अशा घटनांमुळं येणाऱ्या अल्पकालीन अस्थिरतेबद्दल जास्त विचार करू नये, असा सल्ला बहुतेक तज्ज्ञांनी दिला आहे.

कोणत्या क्षेत्रातील समभागांवर लक्ष केंद्रित करावं?

ऊर्जा, पर्यटन, रिॲलिटी, पायाभूत सेवासुविधा, इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाइन अँड मॅन्युफॅक्चरिंग (ESDM) ही पाच क्षेत्रं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार परत आल्यास या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी झेप दिसू शकते.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आपल्या व्यक्तिगत सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel