LIC Sold Shares of Adani Group : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात, एलआयसीनं अदानी समूहाच्या तीन कंपन्यांतील आपले शेअर्स मोठ्या प्रमाणावर विकले आहेत. डिसेंबर तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्नच्या पाहणीतून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार, एलआयसीनं अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्समधील आपली भागीदारी कमी केली आहे.
एलआयसीनं या तिमाहीत अदानी समूहाच्या तीन कंपन्यांतील ३,७२,७८, ४६६ शेअर्स विकले आहेत. एलआयसी ही अदानी समूहातील सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे. एलआयसीनं कोणत्या कंपनीतील नेमकी कोणती गुंतवणूक कमी केली आहे पाहूया…
अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये सप्टेंबरच्या तिमाहीपर्यंत असलेला ३.६८ टक्के वाटा एलआयसीनं डिसेंबरअखेरच्या तिमाहीत ३ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. या तिमाहीत अदानी एनर्जीचा शेअर ४२ टक्के वधारलेला आहे. कंपनीचे शेअर्स आज मंगळवारी २ टक्क्यांनी घसरून ११२७ रुपयांवर व्यवहार करत आहेत. अदानी एनर्जी सोल्युशन्सची मार्केट कॅप १,२५,८२७.२५ कोटी रुपये आहे.
एलआयसीनं मागील तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीअखेर अदानी एन्टरप्रायझेसमधील आपला हिस्सा ४.२३ टक्क्यांवरून ३.९३ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तिसर्या तिमाहीत अदानी एन्टरप्राइझेसचा शेअर जवळपास २९ टक्के वर होता. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स आज किरकोळ घसरले असून इंट्रा-डेमध्ये ३०६८.६५ रुपयांवर पोहोचले. या कंपनीचं बाजार भांडवल मूल्य ३,४९,८२६.४४ कोटी रुपये आहे.
एलआयसीनं अदानी पोर्ट्समधील आपली भागीदारी देखील कमी केली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत ९.०७ टक्के असलेला वाटा तिसऱ्या तिमाहीत ७.८६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे या तिमाहीत अदानी पोर्ट्सचा शेअर ४६ टक्क्यांपेक्षा जास्त वधारला आहे. अदानी पोर्ट्स कंपनीमध्ये एलआयसीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीचं मूल्य २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये आज किंचित घसरण झाली. इंट्राडे ट्रेडमध्ये किंचित घट होऊन कंपनीचे शेअर्स ११९६.०५ रुपयांवर व्यवहार करत होते. अदानी पोर्ट्सची मार्केट कॅप २,५८,३६३.४२ कोटी रुपये इतकी आहे.
(डिस्क्लेमर : वरील लेखात केवळ कंपनीची शेअरच्या कामगिरीची व गुंतवणुकीची माहिती आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या