मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC Share Price: तिमाहीच्या निकालानं चित्रच पालटलं! एलआयसीचा शेअर ९०० पार जाणार

LIC Share Price: तिमाहीच्या निकालानं चित्रच पालटलं! एलआयसीचा शेअर ९०० पार जाणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 14, 2022 01:26 PM IST

LIC Share Price: विमा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या एलआयसीच्या शेअरनं गुंतवणूकदारांच्या मनात आशेचा किरण जागवला आहे.

LIC Share Price
LIC Share Price

LIC Share Price: शेअर बाजारात एन्ट्री केल्यापासून प्रत्येक दिवशी गुंतवणूकदारांना धक्क्यावर धक्के देणाऱ्या एलआयसीच्या शेअरनं आता सकारात्मक वाटचाल सुरू केली आहे. दुसऱ्या तिमाहीच्या निकालांचा एलआयसीच्या शेअर्सच्या किंमतीवर थेट परिणाम झाला असून अवघ्या चार-पाच दिवसांत हा शेअर पाच टक्क्यांनी वधारला आहे. येत्या काही दिवसांत शेअरचा भाव ९०० च्या पुढं जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

एलआयसीनं मागील आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार, एलआयसीचा निव्वळ नफा १५ हजार ९५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत एलआयसीनं १,४३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत एलआयसीला प्रीमियमच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढून १,३२,६३१.७२ रुपये झालं आहे. मागील वर्षी हे उत्पन्न १,०४,९१३.९२ कोटी रुपये इतकं होतं. तर, मागील वर्षी १८,७२,०४३.६ कोटी असलेलं एलआयसीचं एकूण उत्पन्न या तिमाहीत २२,२९,४८८.५ कोटींवर पोहोचलं आहे.

कंपनीच्या उत्पन्नातील व नफ्यातील वाढीचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. मागील चार दिवसांपासून एलआयसीच्या शेअरनं सकारात्मक वाटचाल सुरू केली आहे. आज सकाळच्या सत्रात बीएसईवर हा शेअर ६.६६ टक्क्यांनी वाढून ६६९ रुपये झाला होता, तर निफ्टीवर हा शेअर शेअर ६.४५ टक्क्यांनी वाढून ६६८.२० रुपयांवर गेला होता. मागच्या महिनाभरात NSE वर कंपनीच्या शेअर्समध्ये ८.५८ टक्के वाढ झाली आहे. अर्थात, वाढलेला हा भाव कंपनीच्या मूळ लिस्टिंगच्या किंमतीपेक्षा खूपच कमी आहे. एनएसईमध्ये एलआयसीच्या शेअर्स लिस्टिंग ८७२ रुपयांवर झाली होती. तर, कंपनीची इश्यू प्राइस ९४९ रुपये इतकी होती.

गुंतवणूकदारांना संयमाचं फळ मिळणार!

शेअर बाजारात एन्ट्री केल्यापासून एलआयसीचे शेअर सातत्यानं पडत होते. मात्र, त्यानंतरही विक्री न करणाऱ्या गुंतवणूकदारांना संयमाचं फळ मिळण्याची शक्यता आहे. ICICI सिक्युरिटीजच्या मते, एलआयसी पॉलिसींच्या वाढीव वितरणामुळं व्यवसायात वाढ झाली आहे. यामुळंच मार्केट एक्सपर्ट या शेअरच्या बाबतीत प्रचंड आशावादी आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं या शेअरच्या बाबतीत ९१७ चं टार्गेट ठेवलं आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या माहितीनुसार, 'एलआयसीचे शेअर्स अल्पावधीतच ७०० ते ७२० रुपयांपर्यंत मजल मारू शकतात. त्यामुळं हे शेअर असलेल्या गुंतवणूकदारांनी वाट पाहण्यास हरकत नाही. तर, नवीन गुंतवणूकदार ६३० रुपयांचा स्टॉप लॉस लावून हा शेअर खरेदी करू शकतात, असा सल्लाही दिला आहे.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग