LIC share price : दीड वर्षांपासून रडवणारा एलआयसीचा शेअर सुस्साट, सरकारचा महत्त्वाचा निर्णय पथ्यावर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC share price : दीड वर्षांपासून रडवणारा एलआयसीचा शेअर सुस्साट, सरकारचा महत्त्वाचा निर्णय पथ्यावर

LIC share price : दीड वर्षांपासून रडवणारा एलआयसीचा शेअर सुस्साट, सरकारचा महत्त्वाचा निर्णय पथ्यावर

Dec 22, 2023 02:04 PM IST

LIC Share price : मागील दीड वर्षांपासून गुंतवणूकदारांना रडवणारा सरकारी विमा कंपनी एलआयसीचा शेअर आता सुस्साट सुटला आहे.

LIC Share price
LIC Share price

LIC Share price news : शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून गुंतवणूकदारांना रडवणारा सरकारी विमा कंपनी एलआयसीचा शेअर आता सुस्साट सुटला आहे. आज या शेअरच्या भावात ३.७३ टक्क्यांची वाढ झाली असून सध्या तो ७९३ रुपयांवर ट्रेड करत आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाचा हा परिणाम मानला जात आहे.

मागील वर्षी मे महिन्यात एलआयसीचा आयपीओ बाजारात आला होता. बाजार नियामक संस्था सेबीच्या नियमांनुसार, सूचीबद्ध झाल्यानंतर कोणत्याही कंपनीला तीन वर्षांच्या आत २५ टक्के मिनिमम पब्लिक शेअरहोल्डिंगची पूर्तता करावी लागते. विलीनीकरण किंवा अधिग्रहणाच्या बाबतीत हाच कालावधी एक वर्षांचा असतो. एलआयसीच्या बाबतीत ही मुदत सरकारनं १० वर्षांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळं एलआयसीला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचं प्रतिबिंब शेअर बाजारात पडलं आहे.

Gold Silver price today : सोने व चांदीच्या दरात वाढ; पाहा मुंबईतील आजचा भाव

एलआयसीचा शेअर गुरुवारी ७६४.५५ रुपयांवर बंद झाला होता. सरकारच्या निर्णयानंतर आज या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. सकाळच्या सत्रात हा शेअर थेट ८१३ रुपयांवर गेला. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यातील हा उच्चांक आहे. सध्या हा शेअर ७९३ रुपयांवर ट्रेड करत आहे. एलआयसीचे बाजार भांडवल ५ लाख कोटींच्या पुढं गेलं आहे.

आयपीओनं गुंतवणूकदारांना अडकवलं!

प्रचंड गाजावाजा झालेला एलआयसीचा शेअर १७ मे २०२२ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. एलआयसीच्या आयपीओसाठी ९०२ ते ९४९ रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. बीएसईवर (BSE) हा शेअर ८६७.२० तर, राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) ८७२ रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. गुंतवणूकदारांनाच याचा मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून एलआयसीचा शेअर आणि गुंतवणूकदार अद्यापही सावरलेले नाहीत. 

Smartphones Offers: १५ हजारपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत 'हे' जबरदस्त फोन; यादीत टॉप ब्रँड!

वाढता वाढता वाढे!

गेल्या महिनाभरापासून पुन्हा एकदा एलआयसीचा शेअर चढत्या क्रमानं मार्गक्रमण करत आहे. मागच्या सहा महिन्यांत एलआयसीचा शेअर पुन्हा वाढत आहे. मागच्या महिनाभरात त्यात तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, दोन महिन्यात हा शेअर ३५ टक्क्यांनी वाढला आहे. एलआयसीच्या शेअरची ५२आठवड्यांची नीचांकी पातळी ५३०.२० रुपये आहे.

Whats_app_banner