LIC Share price : तिमाही निकालाच्या आधीच एलआयसीच्या शेअरनं गाठला उच्चांक; विकावा की ठेवावा?-lic share price hits record high ahead of q3 results today buy hold or book profit ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC Share price : तिमाही निकालाच्या आधीच एलआयसीच्या शेअरनं गाठला उच्चांक; विकावा की ठेवावा?

LIC Share price : तिमाही निकालाच्या आधीच एलआयसीच्या शेअरनं गाठला उच्चांक; विकावा की ठेवावा?

Feb 08, 2024 05:07 PM IST

LIC Share Price : एलआयसीच्या तिमाही निकाल घोषित होण्याआधीच हा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडत आहेत.

LIC Share price
LIC Share price

LIC Share price : चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्याआधीच जीवन विमा महामंडळ (LIC) अर्थात एलआयसीच्या शेअरनं मोठी झेप घेतली आहे. एलआयसीच्या शेअरच्या किंमतींनी आज नवा उच्चांक गाठला. एनएसईवर हा शेअर आज दिवसभरात ६.४७ टक्क्यांनी वाढून १११२ रुपयांवर पोहोचला.

एलआयसीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आज अपेक्षित आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल सकारात्मक असतील अशी अपेक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज एलआयसीच्या शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्याचं प्रतिबिंब शेअरच्या किंमतीमध्ये पडलं.

मार्केट एक्सपर्ट्स काय म्हणतात?

मोतीलाल ओसवालच्या रिटेल रिसर्च विभागाचे प्रमुख सिद्धार्थ यांनीही तिमाही निकाल मजबूत असतील असा विश्वास व्यक्त केला आहे. व्यवसाय विस्ताराच्या पातळीवर परिस्थिती सकारात्मक असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. 

प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अविनाश गोरक्षकर म्हणाले, 'एलआयसीकडून शेअर बाजाराला उत्तम तिमाही निकाल अपेक्षित आहे. त्याचंच प्रतिबिंब आजच्या व्यवहारात उमटलं आहे. एलआयसीसह सार्वजनिक क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या निकोप वाढीबद्दल व विस्ताराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्याचा अल्पकालीन प्रभाव निश्चित दिसेल, असं गोरक्षकर यांनी सांगितलं.  

कितीपर्यंत जाईल एलआयसीचा शेअर?

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी एलआयसीच्या शेअर्समध्ये आणखी चढ-उताराची अपेक्षा व्यक्त केली आहे. 'एलआयसीचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर सकारात्मक दिसत आहेत. एलआयसीचा शेअर असलेले गुंतवणूकदार १०२० चा स्टॉप लॉस राखून वाट पाहू शकतात. हा शेअर ११५० पर्यंत जाऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. नवीन गुंतवणूकदार देखील १०२० चा स्टॉप लॉस लावून ११२५ ते ११५० चं टार्गेट ठेवून एन्ट्री घेऊ शकतात, असं बागडिया यांनी म्हटलं आहे.

एलआयसीच्या शेअरचा प्रवास

साधारण दोन वर्षांपूर्वी एलआयसीनं आयपीओ आणला होता. एलआयसीच्या आयपीओची मोठी चर्चा झाली होती. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर हा शेअर १७ मे २०२२ बाजारात सूचीबद्ध झाला. मात्र, हा शेअर मूळ किंमतीपेक्षा खाली घसरून सूचीबद्ध झाला. त्यानंतर जवळपास दीड वर्षे हा शेअर गटांगळ्या खात होता. मागच्या काही महिन्यांपासून हा शेअर पुन्हा सावरत असून सहा महिन्यांत सुमारे ७३ टक्क्यांनी वाढला आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग