Stock Market News Today : भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) कंपनीचे शेअर्स आज तब्बल ४ टक्क्यांनी गडगडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात एलआयसीच्या प्रीमियममध्ये झालेली तब्बल २७ टक्के घट हे या घसरणीमागचं कारण आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या आठ महिन्यांत प्रीमियममध्ये १६ टक्के वाढ नोंदवली गेली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये एलआयसीच्या एकूण आणि किरकोळ वार्षिक प्रीमियम समतुल्य (APE) अनुक्रमे १९ टक्के आणि १२ टक्के घसरले.
आज एनएसईवर एलआयसीचा शेअर ९७९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर उघडला. मात्र, एलआयसीच्या काही वेळातच विक्रीचा दबाव आला आणि शेअरनं ९४५.५० रुपयांचा नीचांकी स्तर गाठला.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं खासगी जीवन विमा कंपन्यांच्या प्रभावी कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. खासगी विमा कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२५ साठी आतापर्यंत (आर्थिक वर्ष २०२५ टीडी) वैयक्तिक एपीईमध्ये १५.४ टक्क्यांची मजबूत वार्षिक वाढ दर्शविली आहे. ती आता २१.२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. स्पर्धेचा सामना करणाऱ्या एलआयसीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे.
खासगी विमा कंपन्यांसाठी वैयक्तिक एपीई मार्केट शेअर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ६८.९% पर्यंत वाढला आहे, नोव्हेंबर २०२४ मध्ये एलआयसीच्या कामगिरीमुळं लक्षणीय नफा झाला आहे. खासगी विमा कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांनी आपला बाजारातील वाटा वाढविण्यात लक्षणीय प्रगती केली आहे.
एलआयसीचा शेअर मे २०२२ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. तेव्हापासून या शेअरनं गुंतवणूकदारांची निराशाच केली आहे. मे २०२२ पासून आतापर्यंत कंपनीनं केवळ १५ टक्क्यांचा परतावा दिला आहे. यंदाच्या वर्षभरात शेअरमध्ये केवळ १०.६३ टक्के वाढ झाली आहे. तर, सहा महिन्यांपूर्वी शेअर घेणाऱ्यांना ४.७५ टक्क्यांचा तोटा सहन करावा लागला आहे.
संबंधित बातम्या