Stock Market Updates : चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी बीएसईवर सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) शेअर ९३३.३० रुपयांवर पोहोचला. हा शेअर सध्याच्या भावावरून आणखी ५० टक्क्यांनी वाढू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीत एलआयसीच्या निव्वळ नफ्यात ३.८ टक्क्यांची घट झाली आहे, परंतु ब्रोकरेज विमा कंपनीच्या शेअर्सवर तेजीत आहेत. ब्रोकरेज हाऊसने एलआयसी शेअर्ससाठी १३८५ रुपयांपर्यंतचे टार्गेट दिले आहे.
परदेशी ब्रोकरेज हाऊस सिटीने विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्ससाठी १३८५ रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. तथापि, इतर विश्लेषक नवीन सरेंडर व्हॅल्यू नियमांच्या संभाव्य परिणामांबद्दल साशंक आहेत. नवीन सरेंडर व्हॅल्यू नियम १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाले आहेत.
बर्नस्टीनने एलआयसीच्या नवीन बिझनेस प्रीमियममध्ये वाढ झाल्याचे कारण देत ११९० रुपयांचे टार्गेट प्राइस दिले आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने एलआयसी शेअर्ससाठी १,२५० रुपयांचे टार्गेट प्राइस कायम ठेवले आहे. सीएनबीसी-टीव्ही १८ ने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.
सर्व आव्हाने असूनही भारतीय आयुर्विमा क्षेत्रात एलआयसीचं स्थान भक्कम आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या पहिल्या ६ महिन्यांत एलआयसीने ६१.०७ टक्के मार्केट शेअरसह वर्चस्व कायम ठेवले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एलआयसीचा मार्केट शेअर ५८.५० टक्के होता. तसेच, सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या पहिल्या ६ महिन्यांत विमा कंपनीचे एकूण प्रीमियम उत्पन्न १३.५६ टक्क्यांनी वाढून २.३४ लाख कोटी रुपये झाले आहे.
सरकारी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ ४ मे २०२२ रोजी उघडला गेला आणि तो ९ मे पर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ९४९ रुपये होती. एलआयसीचा शेअर १७ मे २०२२ रोजी बीएसईवर ८६७.२० रुपयांवर लिस्ट झाला होता. कंपनीचा आयपीओ एकूण २.९५ पट सब्सक्राइब झाला.