LIC Share Price : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरनं अखेर गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. आयपीओ आल्यापासून गडगडलेला एलआयसीचा शेअर आता वधारत असून आज प्रथमच त्यानं १००० रुपयांचा टप्पा पार केला आहे.
एलआयसीच्या शेअरनं सोमवारी बीएसईवर ८.८ टक्क्यांच्या वाढीसह १०२७.९५ रुपयांची पातळी गाठली. कंपनीच्या शेअरचा हा उच्चांक आहे. अर्थात, बाजार बंद झाला तेव्हा शेअर पुन्हा एक हजार रुपयांच्या खाली घसरले. एनएसईवर हा शेअर ९९५.७५ रुपयांवर बंद झाला.
एलआयसीचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर रेंगाळले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये वेगानं वाढ झाली आहे. हा सरकारी स्टॉक नोव्हेंबरमध्ये १२.८३ टक्के, डिसेंबरमध्ये २२.५२ टक्के आणि जानेवारीमध्ये १४ टक्के वाढला आहे.
२३ जानेवारी रोजी प्रथमच कंपनीच्या शेअरच्या किंमतीनं ९४९ रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आयपीओ आला तेव्हा एलआयसीच्या शेअरची ही मूळ किंमत होती. त्यामुळं ज्या गुंतवणूकदारांना एलआयसीचा आयपीओ लागला होता आणि ज्यांनी आतापर्यंत शेअर ठेवून घेतले होते, त्यांची प्रतीक्षा संपली आहे. त्यांचे शेअर आता नफ्यात आले आहेत.
कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे एलआयसीचं बाजार भांडवल ६.५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे. एलआयसी ही देशातील सहावी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी बनली आहे. त्याच वेळी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ती पहिल्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारनं किमान २५ टक्के सार्वजनिक शेअर होल्डिंगला मान्यता दिली आहे. म्हणजेच २०२७ पर्यंत या कंपनीत जनतेचा २५ टक्के हिस्सा असेल. सध्या एलआयसीमध्ये सरकारची हिस्सेदारी ९६.५ टक्के आहे. तर, किरकोळ गुंतवणूकदारांकडं २.४ टक्के हिस्सा आहे.
शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळाला. सकाळपासून सकारात्मक असलेले सेन्सेक्स आणि निफ्टी दुपारनंतरच्या सत्रात घसरत गेले आणि शेवटी घसरून बंद झाले. सेन्सेक्स ३५४.२१ अंकांनी पडून ७१,७३१.४२ रुपयांवर बंद झाला, तर निफ्टी ८२.१० रुपयांनी घसरून २१,७७१.७० रुपयांवर बंद झाला.
(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)