LIC portfolio value news : भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. अनेक गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ हिरवेगार झाले आहेत. भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीही त्यास अपवाद नाही. शेअर बाजारातील तेजीचा मोठा फायदा एलआयसीला झाला आहे. मागच्या ५० दिवसांत एलआयसीनं ८० हजार कोटी (अंदाजित नफा) कमावले आहेत.
मागच्या दीड महिन्यात एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या सुमारे ११० समभागांनी दोन अंकी परतावा दिला आहे. गोकाक टेक्सटाइल्सच्या समभागांनी सर्वाधिक २०४ टक्के परतावा दिला आहे. गोकाक टेक्सटाइल्समध्ये एलआयसीचा वाटा ४.५४ टक्के आहे.
चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीमध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनी, अदानी टोटल गॅस, बीएसई, स्पेन्सर्स रिटेल, द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी, स्वान एनर्जी आणि पॉवर फायनान्सचा समावेश आहे.
तिसऱ्या तिमाहीत आतापर्यंत एलआयसीला इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या समभागांनी ८७ टक्के, ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीच्या समभागांनी ८२ टक्के आणि अदानी टोटल गॅसच्या समभागांनी ८१ टक्के परतावा दिला आहे. इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये एलआयसीची १.५७ टक्के भागीदारी आहे. ओरिएंट ग्रीन पॉवर १.५८ टक्के भागीदारी आहे, असं इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.
एलआयसीचा इक्विटी पोर्टफोलिओ सुमारे ८०,३०० कोटी रुपयांनी वाढून ११.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२३ तिमाहीच्या शेवटी एलआयसीच्या इक्विटी पोर्टफोलिओचं मूल्य सुमारे १०.९ लाख कोटी रुपये होतं. एलआयसीची सर्वाधिक गुंतवणूक रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमधील एलआयसीच्या शेअरचे मूल्य ६.२७ टक्के अर्थात, सुमारे १ लाख कोटी रुपये आहे. तर, आयटीसीमध्ये ८६ हजार कोटी, टीसीएसमध्ये ६४ हजार कोटी रुपये, एचडीएफसी बँकेत ५४ हजार कोटी रुपये गुंतवले आहेत.
संबंधित बातम्या