LIC Jeevan Dhara II : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) शुक्रवारी नव्या योजनेची घोषणा केली. 'जीवन धारा २' असं या पॉलिसीचं नाव असून ही एक व्यक्तिगत बचत, नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग योजना आहे. या अंतर्गत पॉलिसीधारकाला विशिष्ट कालावधीनंतर प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम परत मिळणार आहे.
येत्या सोमवारपासून ही योजना विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही पॉलिसी घेण्यासाठी वयाची अट किमान २० वर्षे आहे. या पॉलिसीअंतर्गत सुरुवातीपासूनच अॅन्युइटीची हमी मिळणार आहे आणि संभाव्य पॉलिसीधारकांसाठी ११ अॅन्युइटी पर्याय उपलब्ध असतील.
एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांच्या हस्ते शुक्रवारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्रीमियम पूर्ण भरून झाल्यानंतरच्या डिफरमेंटच्या कालावधीतही ही पॉलिसी जीवन विमा संरक्षण पुरवते आणि वाढत्या वयात वाढीव दरानं परतावा देते. या योजनेत अॅन्युइटी पर्यायांतर्गत डिफरमेंट कालावधीत किंवा नंतरही कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
एलआयसीची जीवन धारा २ ही नवी योजना एक पेन्शन योजना आहे. यात एकरकमी प्रीमियम भरणा, नियमित प्रीमियम भरणा, डिफर्ड मोड, गॅरंटीड पेन्शन, सेव्हिंग्स, नॉन लिंक्ड, टॉप अप अॅन्युइटी, वाढीव अॅन्युइटी या खास सुविधा मिळतात.
नियमित प्रीमियम भरणा करण्यासाठी ९ पर्याय उपलब्ध.
एकरकमी प्रीमियम पेमेंटसाठी दोन पर्याय उपलब्ध.
२० ते ८० वर्षे वयोगटातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पेन्शन योजना एकरकमी प्रीमियमसाठी वय वर्षे ३१ आणि नियमित प्रीमियमसाठी वय वर्षे ३५ पासून सुरू होते.
जीवन धारा २ मध्ये अॅन्युइटीचा लाभ कधी सुरू करायचा हे ठरविण्यासाठी पॉलिसीधारकांना दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यानुसार नियमित प्रीमियम भरणाऱ्यांसाठी हा कालावधी ५ ते १५ वर्षे तर, एकरकमी प्रीमियम भरणाऱ्यांसाठी हा कालावधी १ ते १५ वर्षे आहे.
प्रीमियम जितका जास्त, अॅन्युइटी रेट तितकाच जास्त असेल.
एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावावर संयुक्तपणे ही पॉलिसी घेता येईल.
जीवन धारा २ मध्ये टॉप अप अॅन्युइटीचा पर्याय उपलब्ध आहे. या अंतर्गत डिफरमेंट कालावधीत तुम्ही आणखी प्रीमियम भरू शकता. त्यामुळं अधिक पैसे जमा होऊन तुम्हाला अधिक पेन्शन मिळू शकते.
जीवन धारा २ पॉलिसमीध्ये जीवन विम्याचं संरक्षणही मिळतं. पॉलिसी सुरू झाल्यानंतर काही कारणास्तव पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते. त्यासाठी त्यांना डेथ क्लेम करावा लागेल.