LIC Housing Finance Q1 results : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार करण्यात आघाडीवर असलेल्या एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीचे २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल आले आहेत. त्यानुसार, एप्रिल ते जून या तीन महिन्यांत कंपनीच्या नफ्यात तब्बल ४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गृहकर्जाच्या वाढत्या मागणीमुळं नफ्यात ही वाढ झाली आहे.
गृहकर्ज देणाऱ्या अनेक वित्तीय संस्था बाजारात आहेत. मात्र, एलआयसी या नावाची विश्वासार्हता जमेची बाजू ठरली आहे. वाढती महागाई व व्याजदरांत वाढ होऊनही मध्यमवर्ग रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहे. करोना महामारीच्या नंतर देशभरात घरांची मागणी वाढली आहे. त्याचा फायदा एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीला झाला आहे.
एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४३ टक्क्यांनी वाढून १३२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीनं ९२५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. व्याजापोटी मिळणारं उत्पन्न २८ टक्क्यांनी वाढून ६,७०४ कोटी रुपये झालं आहे. कंपनीचं निव्वळ व्याज उत्पन्न (NII) मागील आर्थिक वर्षात १,६२८ कोटी रुपये होतं, ते यंदाच्या तिमाहीत ३८ टक्क्यांनी वाढून २,२५२ कोटी रुपये झालं आहे.
एलआयसी हाऊसिंग फायनान्सचा एकूण खर्च या तिमाहीत २३ टक्क्यांनी वाढला आहे. खर्चाचा एकूण आकडा ४,४९४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
कुठल्याही कंपनीच्या तिमाही निकालाचे पडसाद शेअर बाजारात उमटत असतात. LIC HFL देखील यास अपवाद नाही. मात्र, कंपनीचा नफा वाढूनही शेअरच्या भावावर मात्र नकारात्मक परिणाम झाला आहे. काल ४१९ रुपयांच्या आसपास असलेला कंपनीचा शेअर सध्या ४११.८० रुपयांवर ट्रेड करत आहे.