IPO Listing Today News : लक्ष्मी डेंटल लिमिटडेच्या शेअरनं बाजारात दमदार सुरुवात झाली आहे. लक्ष्मी डेंटलचे शेअर्स बीएसईवर २३ टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह ५२८ रुपयांवर सूचीबद्ध झाले आहेत. तर एनएसईवर कंपनीचे शेअर्स २६.६४ टक्के प्रीमियमसह ५४२ रुपयांवर लिस्ट झाले आहेत.
आयपीओमध्ये लक्ष्मी डेंटलच्या शेअरची किंमत ४२८ रुपये होती. कंपनीचा आयपीओ १३ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि १५ जानेवारीपर्यंत खुला राहिला. लक्ष्मी डेंटलचा एकूण इश्यू साइज ६९८.०६ कोटी रुपयांपर्यंत होता.
उत्साहवर्धक लिस्टिंगनंतर बीएसईवर कंपनीचा शेअर ५५९.४० रुपयांवर पोहोचला आहे. तर एनएसईवर कंपनीचा शेअर ५४९ रुपयांवर पोहोचला आहे. आयपीओच्या आधी कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ४६.५६ टक्के होता, तो आता ४१.७ टक्क्यांवर आला आहे.
लक्ष्मी डेंटलचा आयपीओ एकूण ११४.१४ पट सब्सक्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांनी हा शेअर ७५.१ पट सब्सक्राइब केला. तर, नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) श्रेणीत १४७.६९ पट, तर क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) श्रेणीत ११०.३८ पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १४ लॉटसाठी गुंतवणूक करू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये ३३ शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओच्या एका लॉटसाठी १४,१२४ रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
लक्ष्मी डेंटल लिमिटेडची स्थापना जुलै २००४ मध्ये झाली होती. लक्ष्मी डेंटल ही इंटिग्रेटेड डेंटल प्रॉडक्ट्स कंपनी आहे. कंपनी कस्टम क्राउन आणि ब्रिज, ब्रँड डेंटल आयटमचा पुरवठा करते. कंपनी पूर्णपणे इंटिग्रेटेड मॉडेलअंतर्गत काम करते. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत, कंपनीच्या दंत नेटवर्कमध्ये २२ हजारपेक्षा जास्त क्लिनिकचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार कंपनीत विविध विभागांमध्ये २३७२ कर्मचारी होते.
संबंधित बातम्या