IPO News : आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी खास, एकाच दिवशी ६ आयपीओ खुले होणार, जाणून घ्या सविस्तर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी खास, एकाच दिवशी ६ आयपीओ खुले होणार, जाणून घ्या सविस्तर

IPO News : आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी खास, एकाच दिवशी ६ आयपीओ खुले होणार, जाणून घ्या सविस्तर

Dec 19, 2024 10:50 AM IST

IPO News Today : गुंतवणूकदारांसाठी वर्षाचा शेवट धमाकेदार असणार आहे. तब्बल ६ आयपीओ आज एकाच दिवशी खुले होत आहेत.

आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी खास, एकाच दिवशी ६ आयपीओ खुले होणार, जाणून घ्या सविस्तर
आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी खास, एकाच दिवशी ६ आयपीओ खुले होणार, जाणून घ्या सविस्तर

IPO News In Marathi : आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी यंदाच्या वर्षाचा शेवटचा महिना खूप खास ठरला आहे. आतापर्यंत या महिन्यात तीन कंपन्यांचे आयपीओ लाँच झाले असून पुढच्या काही दिवसांत आणखी १० आयपीओ येत आहेत. आज एकाच दिवशी ६ आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुले होत आहेत.   

या महिन्यात आतापर्यंत विशाल मेगा मार्ट,  वन मोबिक्विक सिस्टीम्स, इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड आणि इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) या कंपन्यांचे आयपीओ लाँच झाले आहेत. १९ ते २३ डिसेंबर दरम्यान १० आयपीओ लाँच होणार आहेत. आज येणाऱ्या आयपीओंपैकी ५ मेनबोर्ड आणि १ एसएमई आयपीओ आहे. तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर जाणून घेऊया प्राइस बँड, जीएमपी आणि इतर डिटेल्स.

ट्रान्सरेल लाइटिंग 

हा ८३९ कोटी रुपयांचा आयपीओ असून प्रति शेअर ४१०-४३२ रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. आजपासून खुला होणारा हा आयपीओ २३ डिसेंबरला बंद होईल. ट्रान्सरेल लाइटिंग ही भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी प्रामुख्यानं वीज पारेषण आणि वितरण व्यवसायात गुंतलेली आहे. आयपीओ अंतर्गत कंपनी ४०० कोटी रुपयांचे नवे शेअर्स विक्रीस काढणार आहे. तर, प्रवर्तक अजन्म होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडच्या १.०१ कोटी इक्विटी समभागांच्या ऑफर फॉर सेल (ओएफएस) चाही समावेश यात असेल. आयपीओच्या कागदपत्रांनुसार, मुंबईतील या कंपनीत अजनमा होल्डिंग्सचा 83.22 टक्के हिस्सा आहे. या शेअरचा ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच जीएमपी १४५ रुपये आहे. म्हणजेच ३४ टक्क्यांपर्यंत परतावा अपेक्षित आहे.

सनथन टेक्सटाइल्स लिमिटेड

हा आयपीओ आज खुला होत असून २३ डिसेंबरपर्यंत त्यात गुंतवणूक करता येणार आहे. आयपीओसाठी ३०५ ते ३२१ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. टेक्सटाइल सूत, पॉलिस्टर सूत, सूती धागा आणि धाग्याचा व्यवसाय ही कंपनी करते. हा आयपीओ ४०० कोटी रुपयांपर्यंतचा नवीन इश्यू आणि १५० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर फॉर सेलचे मिश्रण आहे. या शेअरचा जीएमपी पाहता आयपीओ १२ टक्क्यांपेक्षा जास्त नफा देण्याची शक्यता आहे. 

डीएएम कॅपिटल

इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्सचा आयपीओ १९ डिसेंबर रोजी खुला होणार आहे. त्यासाठी २६९ ते २८३ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. यात ८४०.२५ कोटी रुपयांच्या २.९७ कोटी इक्विटी शेअर्सच्या (ऑफर फॉर सेल) विक्रीचा समावेश आहे. ऑफर फॉर सेलअंतर्गत प्रवर्तक धर्मेश अनिल मेहता, गुंतवणूकदार मल्टीपल अल्टरनेटिव्ह अ‍ॅसेट मॅनेजमेंट, आरबीएल बँक, इझीअ‍ॅक्सेस फायनान्शियल सर्व्हिसेस आणि नरोत्तम सत्यनारायण सेखसरिया यांनी शेअर्स विक्रीसाठी ठेवले आहेत. संपूर्ण इश्यू ओएफएसवर आधारित असल्यानं सर्व उत्पन्न कंपनीऐवजी थेट विक्रेता भागधारकांकडे जाईल. शेअरचा जीएमपी १४८ रुपयांच्या प्रीमियमवर आहे. याचा अर्थ ५२ टक्के नफ्याचे संकेत आहे.

ममता मशिनरी लिमिटेड

पॅकेजिंग मशिनरी उत्पादक ममता मशिनरी लिमिटेडचा आयपीओ १९ डिसेंबर रोजी खुला होणार आहे. यासाठी दरपट्टा २३० ते २४३ रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ २३ डिसेंबर रोजी बंद होणार आहे. गुजरातमधील या कंपनीच्या आयपीओत प्रवर्तकांच्या ७३.८२ लाख इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा (ओएफएस) समावेश आहे. आयपीओतून कंपनीला कोणतीही रक्कम मिळणार नाही आणि संपूर्ण निधी इश्यू विकणाऱ्या भागधारकांकडे जाईल. शेअरचा जीएमपी २०० रुपयांच्या प्रीमियमवर आहे. हे ८२ टक्क्यांपर्यंत नफ्याचं लक्षण आहे.

कॉनकार्ड एन्व्हायरो सिस्टीम्स

पर्यावरण अभियांत्रिकी सोल्यूशन्स पुरविणाऱ्या कॉनकॉर्ड एन्व्हायरो सिस्टीम्सचा आयपीओ १९ डिसेंबरला खुला होईल आणि २३ डिसेंबरला बंद होईल. कंपनीनं आयपीओसाठी प्रति शेअर ६६५ ते ७०१ रुपये प्राइस बँड निश्चित केला आहे. या आयपीओमध्ये १७५ कोटी रुपयांचे नवे शेअर्स आणि ३२५.३३ कोटी रुपयांच्या ४६.४१ लाख शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) चा समावेश आहे. इश्यूचा आकार ५००.३३ कोटी रुपये आहे. कंपनी नव्या इश्यूमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर कॉनकॉर्ड एन्व्हायरो एफझेडई (सीईएफ) इथं वॉटर ट्रीटमेंट सिस्टीमसाठी नवीन 'असेंब्ली' युनिट उभारण्यासाठी तसेच वर्किंग कॅपिटलची गरज भागविण्यासाठी करणार आहे. शेअरचा जीएमपी ७० रुपयांच्या प्रीमियमवर आहे. हे सुमारे १० टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध होण्याचं लक्षण आहे.

न्यू मल्याळम स्टील

एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर हा आयपीओ सूचीबद्ध होणार असून शेअर्सची किंमत ८५ ते ९० रुपये आहे. न्यू मल्याळम स्टीलचा एसएमई आयपीओ आज सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला असून २३ डिसेंबर रोजी बंद होणार आहे. कंपनीनं ४२ कोटी रुपये उभे करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. शेअरचा जीएमपी ३० रुपयांच्या प्रीमियमवर आहे. म्हणजेच लिस्टिंगवर ३४% पर्यंत नफा होऊ शकतो.

जीएमपी investorgain.com नुसार आहे आणि ग्रे मार्केट प्राइस देखील लिस्टिंग किमतीपेक्षा भिन्न असू शकते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner