Rekha Jhunjhunwala news : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मुंबईतील वाळकेश्वर भागात तब्बल १२ अपार्टमेंट्स खरेदी केल्या आहेत. तब्बल १५६ कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला आहे.
वाळकेश्वर इथल्या प्रसिद्ध रॉकसाइड सोसायटीत या अपार्टमेंट्स आहेत. ही सोसायटी ५० वर्षे जुनी आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉकसाइड सोसायटीसह आजूबाजूच्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास होणार आहे. Indextap.com च्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान हे व्यवहार झाले आहेत.
प्रत्येक अपार्टमेंटचा आकार १६०० ते २,५०० चौरस फूट आहे आणि प्रत्येक अपार्टमेंटची किंमत सुमारे १० ते १५ कोटी रुपये आहे. या व्यवहारापोटी झुनझुनवाला यांनी तब्बल ९.०२ कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरलं आहे. सर्वात अलीकडचा व्यवहार १५ मार्च रोजी झाला आहे.
झुनझुनवाला हे मुंबई शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. गेल्या वर्षी रेखा झुनझुनवाला यांची कंपनी किन्टीस्टो एलएलपीनं वांद्रे कुर्ला संकुलात ६०० कोटीमध्ये कार्यालयाची जागा खरेदी केली होती.
२०२२ मध्ये किडनीच्या विकारामुळं मरण पावलेल्या झुनझुनवाला यांनी २०१३ ते २०१७ या कालावधीत रिजवे अपार्टमेंट्स नावाची एक संपूर्ण इमारत ३७१ कोटी रुपयांना विकत घेतली होती. त्यानंतर या इमारतीचं रूपांतर एक अति-आलिशान खासगी घरात करण्यात आलं होतं.
राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर त्यांच्या संपूर्ण साम्राज्याची धुरा रेखा सांभाळत आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी स्टॉक मार्केटमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये रेखा झुनझुनवाला यांची शेअर बाजारातील गुंतवणूक ३९,३३३.२ कोटी इतकी आहे.