lakshya powertech ipo listing : ह्युंडई इंडियाच्या आयपीओनं गुंतवणूकदारांची निराशा केली असताना दुसरीकडं लक्ष्य पॉवरटेक लिमिटेडच्या आयपीओनं मार्केटमध्ये जीव ओतला आहे. या कंपनीचा शेअर बुधवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. पहिल्याच दिवशी या शेअरनं गुंतवणूकदारांना दुप्पट नफा मिळवून दिला.
लक्ष्य पॉवरटेक लिमिटेडच्या शेअर्सची एनएसईवर जोरदार लिस्टिंग झाली. एनएसईवर कंपनीचा शेअर ३४२ रुपयांवर सूचीबद्ध झाला. शेअरची मूळ किंमत १८० रुपये होती. म्हणजेच, हा आयपीओ मूळ किमतीच्या ९० टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतरही शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आणि ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. हा शेअर ३५९.१० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आणि गुंतवणूकदारांना १०० टक्के नफा देऊन गेला.
लक्ष्य पॉवरटेकचा आयपीओ १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. त्याचा दरपट्टा १८० रुपये निश्चित करण्यात आला होता. तीन दिवसांत हा आयपीओ ५७३.३६ पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, ४९.९१ कोटी रुपयांच्या आयपीओतील ७,२५,५२० शेअर्सच्या तुलनेत १,०८,३१,६३,२०० शेअर्ससाठी बोली लागली होती. सर्वाधिक बोली संस्थात्मक खरेदीदारांनी (QIB) लावली होती. पात्र संस्थात्मक श्रेणीत हा आयपीओ २१२.१८ पट, तर किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ५९०.२६ पट सब्सक्राइब झाला होता.
लक्ष्य पॉवरटेक ही कंपनी २०१२ साली स्थापन झाली आहे. लक्ष्य पॉवरटेक लिमिटेडची सुरुवात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल सेवांमध्ये तज्ञ अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम आणि कमिशनिंग (ईपीसीसी) सेवा पुरवठादार म्हणून झाली. त्यानंतर कंपनीनं गॅसवर चालणारे वीज प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी ऑपरेशन अँड मेंटेनन्स (ओ अँड एम) सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या
