Stock Market Updates : क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत आज जवळपास ६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागचे कारण म्हणजे १०६.३० कोटी रुपयांची नवी वर्कऑर्डर हे आहे. मुंबई महापालिकेकडून कंपनीला हे कंत्राट दिलं आहे.
बीएसईवर क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडचा शेअर ७५४ रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीचा शेअर जवळपास ६ टक्क्यांनी वधारून ७९० रुपयांवर पोहोचला. मात्र, अद्याप कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपासून दूर आहेत. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०२३.७५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ६२९.७० रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचे मार्केट कॅप १०८४.०८ कोटी रुपये आहे.
क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी विविध कामांसाठी मनुष्यबळ पुरवण्याचं काम करते. मुंबई महापालिकेच्या शिक्षण व सुरक्षा विभागाला ही कंपनी मनुष्यबळ पुरवणार आहे. मुंबईतील सार्वजनिक क्षेत्राची स्थिती सुधारणं हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीकडं एकूण ५८० कोटी रुपयांची वर्कऑर्डर होती.
सप्टेंबरच्या तिमाहीत क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडला १०.६० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात २८ टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल १४ टक्क्यांनी वाढून २६६ कोटी रुपये झाला आहे.
क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ ६८० ते ७१५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. कंपनीचा आयपीओ १४ मार्च रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला.