Kross IPO GMP today : ट्रेलर एक्सल आणि सस्पेन्शन असेम्ब्लीची निर्मिती करणारी कंपनी क्रॉस लिमिटेडचा आयपीओ आज, ९ सप्टेंबर पासून सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ ११ सप्टेंबरपर्यंत बोलीसाठी खुला राहणार आहे.
क्रॉसच्या आयपीओसाठी २२८ ते २४० रुपये प्रति शेअर हा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. शेअरची फेस व्हॅल्यू ५ रुपये आहे. आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पैशाचा वापर प्रामुख्यानं कर्जाची परतफेड आणि भविष्यातील भांडवली खर्चासाठी करण्याची कंपनीची योजना आहे. आयपीओमधील ९० कोटी रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी आणि ७० कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीसाठी विशेषत: यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी वापरले जातील. याशिवाय खेळत्या भांडवालाची गरज भागवण्यासाठी सुमारे ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
आयपीओचं वाटप गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ एनएसई आणि बीएसई या दोन्ही ठिकाणी सूचीबद्ध होणार असून, सोमवार, १६ सप्टेंबर ही संभाव्य लिस्टिंग तारीख आहे.
ब्रोकरेज फर्म एसबीआय सिक्युरिटीजनं हा आयपीओ सबस्क्राइब करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचा ग्रोथ ट्रॅक रेकॉर्ड पाहता हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो. दीर्घ मुदतीसाठी या आयपीओ सब्सक्राइब करण्याची शिफारस एसबीआय सिक्युरिटीजनं केली आहे.
डेव्हेन चोक्सी रिसर्चनं क्रॉस आयपीओला 'सबस्क्राइब' रेटिंग दिलं आहे. व्यवसाय वाढीची प्रभावी आकडेवारी, स्पर्धात्मक स्थिती आणि सहकाऱ्यांच्या तुलनेत उच्च परतावा ही कंपनीची जमेची बाजू आहे.
क्रॉस आयपीओचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये सध्या ५० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. म्हणजेच क्रोस आयपीओची अंदाजित लिस्टिंग किंमत २९० रुपये असण्याची शक्यता आहे. ही लिस्टिग २४० रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा २०.८३ टक्के जास्त आहे.
क्रोस लिमिटेड ही कंपनी ट्रेलर एक्सल आणि सस्पेन्शन असेम्ब्लीची निर्मिती आणि पुरवठा करते. याशिवाय ही कंपनी कृषी उपकरणं आणि मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठीची उपकरणं मोठ्या प्रमाणावर तयार करते. कंपनीची आर्थिक बाजूही मजबूत आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये निव्वळ नफा ४५.१ टक्क्यांनी वाढून ४४.९ कोटी रुपये झाला आहे. याशिवाय महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढून ६२०.३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.