IPO listing : शेअर बाजार कोसळत असताना केआरएनच्या आयपीओचा धुमाकूळ; पहिल्याच दिवशी केले पैसे दुप्पट
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO listing : शेअर बाजार कोसळत असताना केआरएनच्या आयपीओचा धुमाकूळ; पहिल्याच दिवशी केले पैसे दुप्पट

IPO listing : शेअर बाजार कोसळत असताना केआरएनच्या आयपीओचा धुमाकूळ; पहिल्याच दिवशी केले पैसे दुप्पट

Published Oct 03, 2024 10:21 AM IST

KRN Heat Exchanger IPO Listing : केआरएन हीट एक्स्चेंजरचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची दणदणीत एन्ट्री झाली आहे.

केआरएन एक्स्चेंजरचा आयपीओ अपेक्षेप्रमाणे 'हीट'; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
केआरएन एक्स्चेंजरचा आयपीओ अपेक्षेप्रमाणे 'हीट'; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

IPO Listing : केआरएन हीट एक्स्चेंजरच्या आयपीओनं आज शेअर बाजारात धूमधडाक्यात पदार्पण केलं. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सला बंपर ओपनिंग मिळाली. आयपीओमध्ये २२० रुपये किंमत असलेला हा शेअर ११४ टक्क्यांनी वाढून बीएसईवर ४७० रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर एनएसईवर ११८ टक्क्यांनी वाढून ४८० रुपयांवर लिस्ट झाला. त्यामुळं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. 

एकीकडं शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळत असताना केआरएनच्या शेअरमध्ये लिस्टिंग झाल्यानंतरही जोरदार तेजी पाहायला मिळाली. बीएसईवर या शेअरनं पहिल्याच दिवशी १२५ टक्क्यांची वाढ नोंदवत ४९७ रुपयांचा उच्चांक गाठला.

केआरएन हीट एक्स्चेंजर अँड रेफ्रिजरेशन लिमिटेडचा आयपीओ २५ सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि २७ सप्टेंबर रोजी बंद झाला. हा आयपीओ तीन दिवसांत २१३.२६ पट सब्सक्राइब झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर उपलब्ध आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या शेअर विक्रीत १,०९,९३,००० शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत २,३४,४३,३८,२३० शेअर्ससाठी बोली लागली होती. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत हा आयपीओ ४३०.३९ पट, तर पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत २५३.०४ पट सब्सक्राइब झाला. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार श्रेणीत (RII) हा आयपीओ ९६.५० पट सबस्क्राइब झाला.

आयपीओच्या माध्यमातून १,५५,४३,००० इक्विटी शेअर्स नव्यानं विक्रीस काढण्यात आले होते. आयपीओच्या माध्यमातून उभारली जाणारी सुमारे २४२.५ कोटी रुपयांची रक्कम केआरएन एचव्हीएसी प्रॉडक्ट्स या पूर्ण मालकीच्या उपकंपनीत गुंतवणुकीसाठी वापरली जाईल. राजस्थानमधील अलवरमधील निमराणा इथं नवीन उत्पादन सुविधा उभारल्या जातील आणि उर्वरित रक्कम इतर व्यावसायिक कामांसाठी वापरली जाईल.

काय करते ही कंपनी?

केआरएन हीट एक्स्चेंजर अँड रेफ्रिजरेशन लिमिटेड तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमची पाती, तांब्याच्या नळ्या, वॉटर कॉइल, कंडेन्सर कॉइल आणि बाष्पीभवन कॉइलसह पाती आणि ट्यूबच्या उष्णता वहन करणाऱ्या उत्पादनात आघाडीवर आहे. कंपनी ५ मिमी ते १५.८८ मिमी व्यासाच्या विविध आकार आणि आकारांमध्ये हीट एक्सचेंजर ट्यूब तयार करते. ही उत्पादने घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक उत्पादन (हीटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन) क्षेत्रांची गरज भागवतात. केआरएन डायकिन एअरकंडिशनिंग इंडिया, श्नाइडर इलेक्ट्रिक, किर्लोस्कर चिलर्स, ब्लू स्टार, क्लिमाव्हेंटा क्लायमेट टेक्नॉलॉजीज आणि फ्रिजेल इंटेलिजंट कूलिंग सिस्टम्स सारख्या मोठ्या ग्राहकांना सेवा देते. याशिवाय हे युएई, यूएसए, इटली, सौदी अरेबिया, नॉर्वे, चेक प्रजासत्ताक, जर्मनी आणि यूके सारख्या देशांमध्ये निर्यात करते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner