KPIT Dividend News : भारतातील एक प्रमुख आयटी कंपनी केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निकाल जाहीर करतानाच कंपनीनं गुंतवणूकदारांना डिविडंड देण्याची घोषणा केली आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा निव्वळ नफा १९.२७ टक्क्यांनी वाढून १८६.९७ कोटी रुपये झाला आहे. कंपनीला कामकाजातून मिळालेला महसूल देखील गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १२५६.९६ कोटी रुपयांच्या तुलनेत १७.६ टक्क्यांनी वाढला आहे.
केपीआयटी टेक्नॉलॉजीजनं प्रति शेअर २.५० रुपये लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं २९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण न केलेल्या आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी आणि त्यास मंजुरी देण्यासाठी बैठक बोलावली होती. याच बैठकीत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १०/- रुपयांच्या अंकित मूल्याच्या प्रत्येक शेअरवर २.५० रुपये लाभांश देण्यास मान्यता दिली. या लाभांशासाठी मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
लागोपाठच्या तिमाहीचा विचार करता केपीआयटी टेक्नॉलॉजीजचा निव्वळ नफा ८ टक्क्यांनी कमी झाला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा नफा २०३.७५ कोटी रुपये होता. इतकंच नव्हे, कामकाजातून मिळालेलं उत्पन्न देखील सप्टेंबर २०२४ तिमाहीतील १५२३.३१ कोटी रुपयांच्या तुलनेत १.३ टक्क्यांनी घटलं आहे.
केपीआयटी टेक्नॉलॉजीज आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील व्याज, कर, घसारा आणि एमॉर्टायझेशन (EBITDA) मार्जिनपूर्वीची कमाई मागील तिमाहीच्या २०.८ टक्क्यांच्या तुलनेत २१.१ टक्के आहे. उत्पादकता सुधारणा, महसूल मिश्रण आणि फिक्स्ड कॉस्ट लीव्हरेजमुळं हे शक्य झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
केपीआयटी टेक्नॉलॉजीजचा शेअर बुधवारी एनएसईवर १२६७ रुपयांवर उघडला. दिवसभरात त्यात ८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. बाजार बंद झाला तेव्हा या शेअरचा भाव १३६५.६५ रुपयांवर पोहोचला होता.
संबंधित बातम्या