Q3 Results : उत्पन्न घटले, पण नफा वाढला! कोटक महिंद्रा बँकेचे तिमाही निकाल जाहीर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Q3 Results : उत्पन्न घटले, पण नफा वाढला! कोटक महिंद्रा बँकेचे तिमाही निकाल जाहीर

Q3 Results : उत्पन्न घटले, पण नफा वाढला! कोटक महिंद्रा बँकेचे तिमाही निकाल जाहीर

Jan 18, 2025 02:01 PM IST

Kotak Mahindra Bank Q3 Results : कोटक महिंद्रा बँकेने शनिवारी तिसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर करताना बाजाराचा अंदाज पूर्ण केला नाही

उत्पन्न घटले, पण नफा वाढला! कोटक महिंद्रा बँकेचे तिमाही निकाल जाहीर
उत्पन्न घटले, पण नफा वाढला! कोटक महिंद्रा बँकेचे तिमाही निकाल जाहीर

Q3 Results : कोटक महिंद्रा बँकेनं २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. एकूण उत्पन्नात तिमाही घट नोंदवत बँकेनं गुंतवणूकदारांना काहीसं निराश केलं आहे. अर्थात, उत्पन्नात घट झाली असली तरी बँकेच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax - PAT) वार्षिक आधारावर वाढ झाली आहे. 

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेला करोत्तर नफा ४७०१.०२ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो ४२६४.७८ कोटी रुपये होता. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा करोत्तर नफा ५,०४४.०५ कोटी रुपये होता. बँकेनं करोत्तर नफ्यात वार्षिक सुमारे १०.२५ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे, तर तिमाही आधारावर ६.८० टक्के घसरण नोंदविली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत कोटक महिंद्रा बँकेचा करोत्तर नफा १८२१३,२१ कोटी रुपये आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो १२८७६.०१ कोटी रुपये होता. त्यामुळं पहिल्या नऊ महिन्यांत खासगी बँकेच्या करोत्तर नफ्यात तब्बल ४१.४५ टक्के वाढ झाली आहे.

उत्पन्नात कशी आणि किती झाली घट?

आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचं एकूण उत्पन्न २६,८८०.०२ कोटी रुपये होतं, मात्र तिसऱ्या तिमाहीत ते घसरून २३९४५.७९ कोटी रुपये झालं आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ते २४,०८३.१५ कोटी रुपये होतं. त्यामुळं कोटक महिंद्रा बँकेच्या एकूण उत्पन्नात वर्षानुवर्षे घट झाली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत कोटक महिंद्रा बँकेचं एकूण उत्पन्न ९४,२७३.९१ कोटी रुपये झालं आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ते ६६,३६६.५८ कोटी रुपये होतं. याचा अर्थ मागील वर्षीच्या ९ महिन्यांच्या तुलनेत यंदा हे उत्पन्न ४२ टक्क्यांनी अधिक आहे.

वार्षिक व्याज उत्पन्नात वाढ

कोटक महिंद्रा बँकेच्या वार्षिक निव्वळ व्याज उत्पन्नात १४.७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेचा CASA ठेवी वार्षिक आधारावर १५ टक्क्यानं वाढून ४.५८ लाख कोटींवर पोहोचल्या आहेत. तर, चालू तिमाहीत या ठेवींचं प्रमाण ४२.३ टक्के आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner