Stock Market : कोटक महिंद्रा बँकेवर गेल्या नऊ महिन्यांपासून घातलेली बंदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) उठवली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर कोटक महिंद्रा बँकेचे शेअर कमालीचे वधारले असून भावानं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.
बँकेचा शेअर बुधवारी १.४० टक्क्यांनी वधारून १,९४५.५० रुपयांवर बंद झाला. आज तो १९६३ रुपयांवर खुला झाला. मागील बंदच्या तुलनेत तो जवळपास १ टक्क्यानं वधारला. उघडल्यानंतर काही मिनिटांतच हा शेअर १९८७.७० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. बंदी असतानाही खासगी बँकेच्या शेअरनं गेल्या सहा महिन्यांत १३ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, गेल्या महिन्याभरात त्यात सुमारे २४ टक्के वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर एप्रिल २०२४ पासून निर्बंध लागू केले होते. या अंतर्गत आरबीआयनं बँकेला नवीन ग्राहकांना डिजिटल ऑनबोर्डिंग आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली होती. मात्र आता ती बंदी उठवली आहे. कोटक महिंद्रा बँक आता आपल्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे नवीन ग्राहक जोडू शकते. याशिवाय कोटक महिंद्रा बँकेला नवीन क्रेडिट कार्ड देण्यासही आरबीआयनं मंजुरी दिली आहे.
रिझर्व्ह बँकेनं केलेल्या सुधारात्मक उपाययोजनांबाबत समाधानी असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे आणि नवीन ग्राहकांना ऑनबोर्डकरणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
कोटक यांनी बाह्य सल्लागाराकडून थर्ड पार्टी आयटी ऑडिट केलं होतं आणि इतरही अनेक उपाययोजना केल्या होत्या. माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बँकेनं पर्यवेक्षणाचा उपाय म्हणून अनेक संस्थांवर व्यावसायिक निर्बंध लादले होते. यात खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेवर मार्च २०२२ पर्यंत सुमारे १५ महिन्यांसाठी निर्बंध लादण्यात आले होते.
संबंधित बातम्या