व्यावसायिकाला सर्व प्रकारच्या विम्याचे कवच अत्यंत गरजेचे असते, ही गोष्ट माझ्या बाबांनी व्यवसाय माझ्या स्वाधीन करताना निक्षून सांगितली होती. स्वतःच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी आयुर्विमा, अपघात विमा व आरोग्य विमा घ्यावा, तर दुकान, गोडाऊन, घर, माल आणि मौल्यवान वस्तूंच्या संरक्षणार्थ सर्वसाधारण विमा (जनरल इन्शुरन्स) घ्यावा. संकट कधीही सांगून येत नसल्याने आपण सावध राहणे कधीही श्रेयस्कर. विम्याचे पाठबळ असल्याने मी अनेक संकटांतून तरलो आहे.
वर्ष १९९६-९७ मध्ये मी, माझी पत्नी व मुलगा हृषिकेश (तो तेव्हा एक-दीड वर्षाचा होता) नात्यातील एका विवाह समारंभासाठी मुंबईहून कराडला गेलो होतो. मी सहा महिन्यांपूर्वीच नवी गाडी घेतली होती आणि चालकही उत्साही होता. परतीच्या प्रवासात साताऱ्याच्या पुढे शिरवळजवळ एका मालवाहू ट्रकने अकस्मात आमच्या कारला धडक दिली. त्या अपघातात आम्ही जखमी झालो, पण सुदैवाने मरता मरता वाचलो. मात्र घर्षणामुळे पेटून कारचे खूपच नुकसान झाले. ती ओढत आणून पुण्यातील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी टाकावी लागली. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे नव्या गाडीचा विमा खरेदीच्या वेळीच उतरवला असल्याने आणि आमचाही अपघात विमा असल्याने खर्चाची अगदी पूर्ण नाही तरी बऱ्यापैकी भरपाई मिळाली.
त्यानंतर दोन-तीन वर्षांत पुन्हा एकदा मला अक्षरशः अग्निदिव्यातून जाण्याची वेळ आली. दुबईत एव्हाना माझी पाच गोडाऊन्स झाली होती. त्यातील चार एकत्र व पाचवे शेजारच्या कंपाऊंडमध्ये होते. त्यापलिकडे इतर व्यापाऱ्यांची गोडाऊन्स होती. या व्यापाऱ्यांपैकी एकाने फटाक्यांचा मोठा साठा मागवला होता. तो उतरवून घेताना त्यावर ठिणगी पडून अचानक जबरदस्त स्फोट झाला आणि नंतर आग लागून स्फोटांची मालिकाच सुरु झाली. मी जीवानिशी वाचलो, पण माझ्या गोडाऊन्समधील मालसाठ्याचे जळून नुकसान झाले.
मी गोडाऊन्सचा व मालाचा विमा उतरवला असल्याने मला भरपाई मिळाली, पण त्यातही एक कान टोचणारी घटना अशी घडली, की मी चार गोडाऊन्सचा विमा एका कंपनीकडून, तर पाचव्या गोडाऊनचा विमा दुसऱ्या कंपनीकडून काढून घेतला होता. पहिल्या कंपनीने मला सर्व भरपाई दिली, पण दुसऱ्या कंपनीने बराच मनस्ताप दिला. विमा पॉलिसीवरील बारीक अक्षरात लिहिलेले नियम दाखवून त्याआधारे त्यांनी भरपाईची रक्कम बरीच कमी केली. चूक माझी होती. मी विमा घेण्यापूर्वी हे नियम नीट वाचून आणि समजून घ्यायला हवे होते. त्या प्रसंगातून मी योग्य धडा घेतला आणि नंतर कोणताही विमा उतरवताना मी एजंटला सर्व बारीक-सारीक तपशील विचारु लागलो आणि व्यापक संरक्षण देणारी विमा कंपनी निवडू लागलो.
विमा खरेदी केल्यानंतर वर्ष-दोन वर्षांतच त्याचा फायदा होण्याची घटना माझ्या आयुष्यात योगायोगाने अनेकदा घडली आहे. व्यवसाय स्थिरावताना मी प्रदीर्घ आजार व विविध व्याधींनी त्रासलो होतो. त्या दुखण्यातून वाचण्यासाठी मी अनेक डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटल्सच्या वाऱ्या केल्या आणि विविध उपचार पद्धती वापरुन पाहिल्या. पैसा पाण्यासारखा खर्च होत होता. पण त्यातही समाधानाची बाब म्हणजे मी आरोग्य विमा घेतलेला असल्याने डॉक्टरांच्या तपासण्यांच्या, रुग्णालयातील चाचण्यांच्या, शस्त्रक्रियांच्या व औषधांच्या खर्चाचा भार माझ्यावर पडला नाही.
मी माझ्या कर्मचाऱ्यांचाही अपघात व आरोग्य विमा उतरवला त्याचा त्यांना फायदा झाला. आमच्या मुंबईच्या कार्यालयातील अकाऊंटंट रात्री कामावरुन घरी जात असताना त्याच्या मोटारसायकलला जवळून वेगात जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. डोक्यावर हेल्मेट असल्याने मेंदूला गंभीर दुखापत होण्यापासून तो वाचला, परंतु शरीराच्या अन्य भागाला इजा झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. मी तातडीने भेटायला गेलो असता त्याने खुणेने मला सांगितले, की ‘हेल्मेट घातल्याने माझा जीव वाचला.’ मी या दक्षतेबद्दल त्याचे कौतुक केले आणि धीर दिला, की ‘तू लवकर बरा हो. विमा संरक्षण असल्याने तुला रुग्णालयीन खर्चाची काळजी करण्याची गरज नाही आणि इतर कोणत्याही खर्चाची काळजी आपली कंपनी घेईल.’ तो सुखरुप बरा होऊन कामावर परतला तेव्हा त्याने पहिली गोष्ट काय केली असेल तर आपल्या कुटूंबासाठी आणि मालमत्तेसाठी व्यापक (कॉम्प्रिहेन्सिव्ह) विमा सुरक्षा देणाऱ्या पॉलिसी घेतल्या.
मित्रांनो! जीवनातील प्रत्येक लढाई आपली आपल्यालाच लढावी लागते आणि त्यासाठी संरक्षणाची व खर्चाची तजवीजही स्वतःच करावी लागते. त्यामुळे सदैव जागरुक राहणे सर्वांत उत्तम. यासाठीच व्यावसायिकाकडे अनेक विम्यांचे कवच असावे.
संबंधित बातम्या