फोर्ब्सच्या ताज्या अहवालानुसार ‘वॉलमार्ट’ (Walmart) कंपनीच्या अॅलिस वॉल्टन या जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. ७४ वर्षीय वॉल्टन यांच्याकडे ८९.१ अब्ज डॉलर इतकी संपत्ती असल्याचा अंदाज आहे. अॅलिस वॉल्टन या अमेरिकेतील 'वॉलमार्ट' या बलाढ्य कंपनीचे संस्थापक सॅम वॉल्टन यांची एकुलती एक मुलगी आहे. वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेल्या ‘वॉलमार्ट’च्या शेअर्समुळे त्या जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. अॅलिस यांना दोन सख्खे भाऊ असून ते वॉलमार्ट कंपनीमध्ये उच्च पदावर काम करतात. अॅलिस या कला संग्राहक म्हणून प्रसिद्ध असून जगातल्या जुन्या आणि उत्तमोत्तम पेटिंग आणि कलावस्तु विकत घेऊन त्या संग्रही ठेवतात.
अॅलिस वॉल्टन यांनी ७ ऑक्टोबर १९४९ साली झाला. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी एका बँकरशी लग्न केले. मात्र अडीच वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. फोर्ब्स मासिकात प्रकाशित माहितीनुसार अॅलिस वॉल्टनने दुसरे लग्न केलेले. परंतु त्या लग्नातही त्यांनी घटस्फोट घेतला. अॅलिस वॉल्टन यांना मुलबाळ नाहीए.
दरम्यान, लॉरियलच्या (L'Oréal) कंपनीच्या फ्रँकोइस बेटनकोर्ट या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांच्याकडे वारसा पद्धतीने आलेली ८७ बिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे. फ्रँकोइस ही लॉरियल कंपनीचे संस्थापक युजिन शुलर यांची नात आहे. लॉरियल कंपनीचे संस्थापक युजिन शुलर यांना एकूलती एक मुलगी होती.
वॉल्टन कुटुंबात बहुतेक सर्वांचे नाव जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत आहे. अॅलिस यांचे बंधू जिम आणि रॉब वॉल्टन यांनीही आपला ठसा उमटवला आहे. ब्लूमबर्गनुसार ७६ वर्षीय जिम वॉल्टन यांच्याकडे १०२.६ अब्ज डॉलर, तर ७९ वर्षीय रॉब वॉल्टन यांच्याकडे १००.४ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. या तिन्ही भावंडांच्या एकूण संपत्तीत अलीकडच्या काळात ३० अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. वॉल्टन कुटुंबाकडे एकूण ३५० अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचे बोललं जातं.
हे वाचाः जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क १२ व्या मुलाचा झाला बाबा! एक्सवर पोस्ट करत दिली खुशखबर
अॅलिस वॉल्टन या अमेरिकेत राजकारणात सक्रिय असून निवडणुकीच्या काळात त्या डेमोक्रेटिक पक्षाला पाठिंबा देत असतात. २०१६ साली डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या निवडणूक प्रचारासाठी ३,५३,४०० अमेरिकी डॉलर एवढी देणगी दिली होती.