Bonus issue announcement : दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्सची भेट देण्याचा सपाटा लावला आहे. त्यात आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. वस्त्रोद्योगाशी संबंधित किटेक्स गारमेंट्स या कंपनीनं आपल्या भागधारकांना खूषखबर दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं २:१ या प्रमाणात बोनस शेअर देण्यास मंजुरी दिली आहे.
किटेक्स गारमेंट्सच्या संचालक मंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक एका शेअरमागे २ शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. शुक्रवारी बीएसईवर किटेक्स गारमेंट्सचा शेअर सध्या ६३६.७० रुपयांवर व्यवहार करत आहे.
गेल्या ५ महिन्यांत किटेक्स गारमेंट्सच्या शेअरमध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. किटेक्स गारमेंट्सचा शेअर २१ जून २०२४ रोजी २१३.५५ रुपयांवर होता. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ६४४ रुपयांवर पोहोचला. तर गेल्या महिन्याभरात शेअरमध्ये जवळपास ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत किटेक्स गारमेंट्सचा शेअर ८४ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६७९.९० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १७६.८० रुपये आहे.
गेल्या ४ वर्षात किटेक्स गारमेंट्सचा शेअर ५४५ टक्क्यांनी वधारला आहे. २० नोव्हेंबर २०२० रोजी गारमेंट कंपनीचा शेअर ९९.७५ रुपयांवर होता. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ६४४ रुपयांवर पोहोचला. गेल्या तीन वर्षांत किटेक्स गारमेंट्सच्या शेअरमध्ये २७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, गेल्या वर्षभरात किटेक्स गारमेंट्सच्या शेअरमध्ये २१० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
किटेक्स गारमेंट्स या कंपनीनं यापूर्वी देखील आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीनं जून २०१७ मध्ये आपल्या भागधारकांना २:५ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीनं आपल्या शेअरहोल्डर्सना प्रत्येक ५ शेअरमागे २ बोनस शेअर्सचं वाटप केलं होतं.