भारतात वाहन उद्योग क्षेत्रात कारच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे. अशावेळी वाहन विक्रीला चालना देण्यासाठी कार कंपन्या आता विविध क्लृप्त्या राबवत आहेत. किआ इंडियाने (KIA India)ने शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने कार एक्स्चेंज सेवा सुरू करण्याची घोषणा केली. ‘Exchange Your Car’ या नावाने ही सेवा सुरू करण्यात आली असून KIA Seltos कार विकत घेणाऱ्या संभाव्य ग्राहकाला या ऑनलाइन चॅनेलचा वापर करून त्यांच्याकडे असलेल्या विद्यमान कारची किंमत निश्चित करण्यास मदत होणार आहे.
'किआ इंडिया'ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार कार खरेदी करू इच्छिणारा कोणताही ग्राहक कियाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून 'Buy' विभागांतर्गत ‘Exchange Your Car’ टॅबवर जाऊन ही प्रक्रिया करू शकतो. येथे जाऊन तुमच्याकडे आत्ता असलेेल्या वाहनाचे मॉडेल, व्हेरियंट, ब्रँड आणि मॅन्युफॅक्चरिंगचे वर्ष इत्यादी तपशील प्रविष्ट करावा. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर ग्राहकाला वाहनाची अंदाजित किंमत कळू शकते. नवीन किआ कार खरेदीच्या वेळी ग्राहक हे वाहन एक्स्चेंज करू शकतो.
'ऑनलाइन कार एक्स्चेंज सेवेचे अनेक फायदे असून यामुळे नवीन किआ कार मॉडेलमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तीसाठी संपूर्ण कार-एक्सचेंज प्रक्रिया वेगवान होणार आहे. ही एक्स्चेंज सेवा अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविली जाते. त्यामुळे नवीन वाहन खरेदीचा ग्राहकाचा प्रवास सुकर होतो, अशी माहिती किआ इंडियाचे मुख्य विक्री ऑफिसर म्युंग-सिक सोहन यांनी दिली. ‘एक्स्चेंज यूवर कार’ या मोहिमेमुळे किया कंपनीच्या कार विक्रीत वाढ होईल असा कंपनीचा अंदाज आहे. 'या ऑफरमुळे केवळ आमची बाजारपेठेची पोहोच वाढणार नसून संभाव्य खरेदीदारांशी विश्वासार्ह संबंध देखील तयार होतील. आम्ही आमच्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करत असून एक्स्चेंज सेवेद्वारे ग्राहकांना एक समाधानकारक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सोहन यांनी सांगितले.
किआ ही दक्षिण कोरियातील सर्वात मोठी चारचाकी वाहन निर्मिती करणारी कंपनी आहे. किआचा भारतीय बाजारपेठेत २०१९ साली प्रवेश झाला. कंपनीने भारतात आत्तापर्यंत चार मॉडेल्स लॉंच केले असून त्यात सोनेट आणि सेल्टोज हे दोन एसयूव्ही मॉडेल आहेत. कॅरेन हे एमपीव्ही असून ईव्ही६ हे इलेक्ट्रिक मॉडेल आहे. किआच्या कार्निवल या मॉडेलची सध्या चाचणी सुरू असून २०२४ च्या अखेरीस बाजारात दाखल करण्याचा कंपनीचा विचार आहे. EV9 ही किआची संपूर्ण इलेक्ट्रिक SUV लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
संबंधित बातम्या