Share Market News Today : शेअर बाजारातील एकूण अस्थिर वातावरणाचा फटका चांगल्या कंपन्यांच्या शेअरलाही बसत असल्याचं दिसत आहे. केईसी इंटरनॅशनलचा शेअरही यात आहे. कंपनीला १,१३६ कोटी रुपयांच्या नव्या ऑर्डर्स मिळाल्यानंतरही हा शेअर ५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्येही काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.
केईसी इंटरनॅशनलचा शेअर आज १०.५३ मिनिटांच्या सुमारास ५.११ टक्क्यांनी घसरून १,०६९.५५ रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीच्या पारेषण आणि वितरण व्यवसायानं पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून देशातील ७६५ केव्ही ट्रान्समिशन लाइन प्रकल्पासाठी ऑर्डर्स मिळवल्या आहेत.
भारतात 'कवच' अंतर्गत ट्रेन कोलिजन अव्हायडन्स सिस्टिम सेगमेंटमध्येही कंपनीला ऑर्डर मिळाली आहे. भारतातील एका अग्रगण्य पीएसयूकडून पाईपलाईन आणि संबंधित कामांसाठी पाईपलाईन व्यवसायाचं डिझाइन, पुरवठा आणि उभारणीचे आदेश मिळाल्याची माहितीही कंपनीनं दिली आहे.
केईसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विमल केजरीवाल म्हणाले, 'या नवीन ऑर्डर्समुळं कंपनीच्या वर्षभरातील ऑर्डर्सचं मूल्य २०,६०० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे मूल्य ८० टक्क्यांनी जास्त आहे.
'हरित ऊर्जा निर्मितीसाठी पीजीसीआयएलकडून ७६५ केव्ही ऑर्डरमुळं भारतातील आमच्या टी अँड डी ऑर्डर बुकला चालना मिळाली आहे. तेल आणि गॅस पाइपलाइन व्यवसायानं (डिझाइन, पुरवठा आणि बांधकामासह) आपली पहिली ऑर्डर प्राप्त केली आहे, असं केजरीवाल यांनी सांगितलं.
ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशन (टी अँड डी) व्यवसायात कंपनीला १०९७ कोटी रुपयांच्या दोन आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळाल्या आहेत. त्याच्या पहिल्या ऑर्डरमध्ये युएईमध्ये ४०० किलोव्होल्ट (केव्ही) ट्रान्समिशन लाइन बसविण्याचा समावेश होता. दुसऱ्या ऑर्डरसाठी अमेरिका, मेक्सिको आणि ब्राझीलमधील टॉवर्स, हार्डवेअर आणि पोलचा पुरवठा करावा लागणार आहे.
गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये जवळपास ७५ टक्के वाढ झाली आहे. मात्र, या नव्या वर्षात त्यात ११ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत त्यानं १९ टक्के परतावा दिला आहे. शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांक १३१३.२५ रुपये आणि नीचांक ५९७ रुपये आहे.
संबंधित बातम्या