Share Market : आठवड्याच्या पहिल्या दिवशी ढासळलेले सेन्सेक्स आणि निफ्टी आज सावरत असताना केनेस टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये तब्बल १९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ चे महसुली अंदाज घटवल्यानंं ही घसरण झाली आहे. कंपनीनं महसुली अंदाज ३,००० कोटी रुपयांवरून २,८०० कोटी रुपयांवर आणला आहे.
सीएनबीसी-टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, कंपनीच्या व्यवस्थापनानं डिसेंबर तिमाहीत काही ऑर्डर्स पूर्ण करण्यास विलंब झाल्याची कबुली दिली. त्यामुळं औद्योगिक क्षेत्रातील १०० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स अपूर्ण राहिल्या. यापैकी बहुतांश ऑर्डर चालू तिमाहीत पूर्ण होतील, असा अंदाज आहे. २०२६ या आर्थिक वर्षासाठी कंपनीनं ४,५०० कोटी रुपयांच्या महसुलाचा अंदाज व्यक्त केला असून, १५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्जिन मिळण्याची अपेक्षा आहे.
आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) ४७ टक्क्यांनी वाढ झाली असून तो ६६.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या व्यतिरिक्त, या तिमाहीतील महसूल ६६१.२ कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील ५०९.३ कोटी रुपयांच्या तुलनेत तो ३० टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय एबिटडा (इतर उत्पन्न वगळून) मध्ये लक्षणीय वाढ झाली असून गेल्या वर्षी याच कालावधीत ६९.९० कोटी रुपयांवरून तो ३५ टक्क्यांनी वाढून ९४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
कंपनीचं एबिटडा मार्जिन (इतर उत्पन्न वगळून) ५० बेसिस पॉईंट्सनं वाढलं आणि आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत १४.२ टक्क्यांपर्यंत पोहोचलं. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत तो १३.७ टक्के होतं, तर पीएटी मार्जिन देखील १२० बेसिस पॉईंट्सनं वाढलं आणि आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत १०.१ टक्क्यांपर्यंत पोहोचलं. मागील वर्षाच्या याच तिमाहीत ते ८.९ टक्के होतं.
३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या ९ महिन्यांच्या कालावधीत आमचा महसूल १७,३७३ दशलक्ष रुपये होता. मागील वर्षाच्या ९ महिन्यांच्या कालावधीत तो ११,६७३ दशलक्ष रुपये होता. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत आमची ऑर्डरबुक ६०,४७१ दशलक्ष रुपये होती. आर्थिक वर्ष २०२५ आणि त्यापुढील कालावधीसाठी हा चांगला संकेत आहे, असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रवर्तक रमेश कुन्हीकन्नन यांनी सांगितलं.
'चालू तिमाहीत निव्वळ कार्यशील भांडवलाचं चक्र सुधारून १०७ दिवसांवर आलं आहे, जे आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ११७ दिवस होते. आम्ही उच्च क्षमता आणि उच्च मार्जिन सेगमेंटमध्ये गुंतवणूक करत आहोत. त्यामुळं विकासाची गती टिकवून ठेवण्यास मदत होईल आणि या सेगमेंटमधील एक वेगळी कंपनी बनेल,' असा विश्वासही रमेश कुन्हीकन्नन यांनी व्यक्त केला.
केनेस टेक्नॉलॉजीच्या शेअरचा भाव आज बीएसईवर ४,८७७ रुपयांवर उघडला. शेअर इंट्राडे उच्चांकी ४,९१७.४५ रुपये आणि इंट्राडे नीचांकी स्तर ४,२५६.६५ रुपयांवर पोहोचला. मेहता इक्विटीज लिमिटेडचे तांत्रिक विश्लेषक रियांक अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ च्या महसुली वाढीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कपात केल्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास २० टक्क्यांनी घसरली. तांत्रिकदृष्ट्या हा शेअर ४,५६६ च्या प्रमुख सपोर्ट मार्कच्या खाली घसरला आहे. इथून हा शेअर ५००० ते ५१०० च्या दिशेनं गेल्यास ती बाहेर पडण्याची संधी मानली पाहिजे. कारण यानंतर शेअर आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या