Stock Market News : याला म्हणतात घबाड! ५४ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी २५२ रुपयांवर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market News : याला म्हणतात घबाड! ५४ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी २५२ रुपयांवर

Stock Market News : याला म्हणतात घबाड! ५४ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी २५२ रुपयांवर

Jan 05, 2024 04:36 PM IST

Kay cee energy IPO Listing news : केसी एनर्जी या कंपनीची आज राष्ट्रीय शेअर बाजारात मोठ्या दणक्यात एन्ट्री झाली. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकलं आहे.

Kay Cee Energy Share Price
Kay Cee Energy Share Price

Kay cee energy IPO Listing news : योग्य कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याचा किती फायदा होऊ शकतो हे केसी एनर्जीच्या शेअरनं आज दाखवून दिलं. या कंपनीनं शेअर बाजारात धमाका केला आहे. केसी एनर्जीचे शेअर्स शेअर बाजारात तब्बल ३६७ टक्के नफ्यासह सूचीबद्ध झाले आहेत. 

केसी एनर्जी कंपनीचा आयपीओ २८ डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि २ जानेवारीपर्यंत त्यात गुंतवणुकीची संधी होती. या आयपीओसाठी प्रति इक्विटी शेअर ५४ रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. हा आयपीओ १०५२ पट सबस्क्राइब झाला होता. शिवाय, ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअरला जोरदार मागणी होती. त्यामुळं हा शेअर प्रीमियमवर लिस्ट होणार असे संकेत आधीच मिळाले होते. मात्र, या शेअरनं अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी केली आहे.

kalyan Jewellers : कल्याण ज्वेलर्सच्या शेअरनं गाठला नवा उच्चांक, तुमच्याकडं आहे का?

पहिल्याच दिवशी चार लाखांचा नफा

किरकोळ गुंतवणूकदार कंपनीच्या आयपीओमध्ये एका लॉटसाठी बोली लावू शकत होते. केसीच्या आयपीओ लॉटमध्ये २००० शेअर्स आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना त्यासाठी १,०८,००० रुपये गुंतवावे लागले. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये एक लॉट म्हणजेच २००० शेअर्स मिळाले होते, त्या शेअर्सचं सध्याचं मूल्य ५,०४,०० रुपये झालं आहे. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ३,९६,००० रुपयांचा दणदणीत नफा झाला आहे.

काय करते केसी एनर्जी ही कंपनी?

केसी एनर्जी अँड एन्फ्रा ही एक इंजिनीअरिंग, पुरवठादार आणि बांधकाम (EPS) कंपनी आहे. ओव्हरहेड आणि अंडरग्राउंड लाइन्स, सबस्टेशनची बांधकामं, ऑटोमेशन इत्यादीसह वीज वाहक आणि वितरक यंत्रणांच्या प्रकल्पांचे बांधकाम आणि ते कार्यान्वित करण्याच्या सेवा ही कंपनी देते.

IPO Explainer : आयपीओ म्हणजे काय? जाणून घ्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचा भन्नाट पर्याय

लोकेंद्र जैन आणि शालिनी जैन हे केसी एनर्जीचे प्रवर्तक आहेत. आयपीओ येण्याआधी कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा ९६.१२ टक्के इतका होता. आता हा वाटा ७०.२५ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. जीवायआर कॅपिटल अॅडवायजर्स प्रा. लिमिटेड हे आयपीओचे व्यवस्थापक आहेत. तर, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner